अंतिम मतदार याद्या आज जाहीर होणार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जानेवारी 2017

पुणे - महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यासाठी प्रशासनाचे रविवारी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते. सोमवारी (ता. 23) या याद्या राजकीय पक्षांना पाहायला मिळण्याची शक्‍यता आहे. 

पुणे - महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यासाठी प्रशासनाचे रविवारी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते. सोमवारी (ता. 23) या याद्या राजकीय पक्षांना पाहायला मिळण्याची शक्‍यता आहे. 

शहरात सुमारे 26 लाख 42 हजार मतदार आहेत. त्यातील एक लाख 68 हजार नवमतदारांची नावे पुरवणी यादीमध्ये समाविष्ट झाली आहेत. महापालिकेने मतदारांच्या प्रभागनिहाय प्रारूप याद्या 12 जानेवारी रोजी प्रसिद्ध केल्या होत्या. त्यावर 17 जानेवारीपर्यंत हरकती-सूचना नोंदविण्याची मुदत होती. त्या कालावधीत सुमारे 909 हरकती महापालिकेकडे आल्या होत्या. भौगोलिकदृष्ट्या एका प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात समाविष्ट होणे, प्रभागाच्या हद्दीबाहेर मतदारांची नावे जाणे, प्रभागाच्या हद्दीतील काही भाग दुसऱ्या प्रभागात समाविष्ट होणे आदी प्रकारच्या तक्रारी होत्या. प्रामुख्याने सर्वाधिक तक्रारी असलेल्या प्रभाग क्रमांक 38, 39, 40, 31, 32, 35, 8, 9 इत्यादींमधील मतदार याद्यांत बदल झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. अन्य 22 प्रभागांतील याद्यांतही काही प्रमाणात बदल झाले आहेत. 

सूचना-हरकतींनुसार प्रशासनाने केलेल्या बदलांना राज्य निवडणूक आयोगाकडून मंजुरी घेण्याची प्रक्रिया रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. त्याला मंजुरी मिळाल्यावर या याद्या महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची तयारी सुरू होती. मात्र, अनेक प्रकारच्या तांत्रिक अडचणींमुळे त्याला विलंब लागत होता. सोमवारी या याद्या राजकीय पक्षांना प्रभागनिहाय पाहायला मिळण्याची शक्‍यता प्रशासनाने व्यक्त केली. दरम्यान, निवडणूक असलेल्या 10 महापालिकांमध्येही रविवारी हेच काम सुरू होते. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगातील कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे. परिणामी, या याद्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यास विलंब लागत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

Web Title: The final voter lists will be announced today