केंदूरला अखेर वैद्यकीय अधिकारी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

शिक्रापूर - केंदूर (ता. शिरूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्‍टरांअभावी झालेल्या अर्भकाच्या मृत्यूनंतर जिल्हा परिषद प्रशासनाने येथे डॉ. पायल राठोड यांची अतिरिक्त निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. 

शिक्रापूर - केंदूर (ता. शिरूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्‍टरांअभावी झालेल्या अर्भकाच्या मृत्यूनंतर जिल्हा परिषद प्रशासनाने येथे डॉ. पायल राठोड यांची अतिरिक्त निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. 

तसेच ‘सकाळ’मधील वृत्ताची दखल घेऊन दवाखान्यात दोन रक्तदाब तपासण्याच्या मशिन व तीन टेथोस्कोप तातडीने उपलब्ध करून दिले आहेत. केंदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दहा दिवसांपूर्वी (१२ ऑगस्ट) धामारी (ता. शिरूर) येथील अर्चना विठ्ठल डफळ यांचे बाळंतपण करण्यासाठी निवासी डॉक्‍टर उपस्थित नव्हते. आरोग्य सेविकांनी त्यांचे बाळंतपण केले. या घटनेत बाळ मृत पावले. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त देताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने आरोग्य केंद्रात आले. त्या वेळी ग्रामस्थांनी डॉक्‍टर निवासी नसणे, टेथोस्कोप व रक्तदाब मशिन मोडलेल्या अवस्थेतील दाखविले. त्यानंतर त्यांनी तातडीने येथे आणखी एक निवासी डॉक्‍टरची नेमणूक करण्याची ग्वाही दिली. त्यानुसार डॉ. पायल राठोड या नुकत्याच निवासी म्हणून दाखल झाल्या. त्यांच्यासोबत डॉ. माया पवार याही येथे राहणार आहेत. तसेच, दोन नव्या रक्तदाब मशिन, तीन टेथोस्कोप दिल्या असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे यांनी दिली. 

डॉ. पायल राठोड यांचे स्वागत बगाटे यांनी केले. या वेळी माजी सरपंच रामदास पऱ्हाड व डॉ. माया पवार आदी उपस्थित होते.

थम्ब मशिन बंद; पगार चालू!
केंदूर आरोग्य केंद्रात बायोमेट्रिक हजेरीसाठी थम्ब मशिन बसविली आहे. त्यावरूनच पगार काढले जातात; पण, ही मशिन गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. ती डॉ. पवार यांनीच मुद्दाम बंद ठेवली असू शकते. ते केंदूर येथे राहत नाहीत. त्यामुळे त्यांचा रहिवास भत्ता (९००० रुपये) बंद केला आहे. त्यांची खातेनिहाय चौकशी चालू ठेवल्याचेही डॉ. माने यांनी सांगितले.

Web Title: finally appointed as a medical officer at kendur