महामार्गांवरील वेगाला अखेर ब्रेक!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

द्रुतगती तसेच महामार्गांवरील वेगमर्यादा ताशी १२० वरून १०० किलोमीटर करण्याची अधिसूचना अखेर महामार्ग पोलिसांनी नुकतीच प्रसिद्ध केली. येत्या १८ नोव्हेंबरपासून भरधाव वेगमर्यादेला लगाम बसणार आहे.

पुणे - द्रुतगती तसेच महामार्गांवरील वेगमर्यादा ताशी १२० वरून १०० किलोमीटर करण्याची अधिसूचना अखेर महामार्ग पोलिसांनी नुकतीच प्रसिद्ध केली. येत्या १८ नोव्हेंबरपासून भरधाव वेगमर्यादेला लगाम बसणार आहे.

केंद्र सरकारने देशातील सर्व द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरील प्रति ताशी किलोमीटरच्या वाहतुकीचा वेग वाढविला होता. त्यामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतुकीचा वेग ताशी ८० किलोमीटवरून १२० वर गेला. १ ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली होती. मात्र, वेग वाढल्याने वाहतूक असुरक्षित होऊ लागली होती. तसेच, अपघातही घडले होते. या पार्श्‍वभूमीवर  वेगमर्यादा कमी करण्याची मागणी स्वयंसेवी संस्था आणि तज्ज्ञांनीही केली होती. ‘सकाळ’ने याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. त्याची दखल घेऊन महामार्ग पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम व विधी विभागाकडे वेगमर्यादा कमी करण्याचा प्रस्ताव पाठविला. त्याची दखल  घेऊन संबंधित विभागांनीही वेगमर्यादा कमी करण्यासाठी अभिप्राय दिला.  २५ ऑक्‍टोबर रोजी त्याची  अधिसूचना प्रसिद्ध झाली. 

त्यात सुधारित वेगमर्यादेची अंमलबजावणी १८ नोव्हेंबरपासून करावी, असे महामार्ग पोलिस विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक विनय कारगांवकर यांनी स्पष्ट केले आहे.

वेगमर्यादा वाढविल्यामुळे वाहतूक असुरक्षित झाल्याचे निरीक्षण होते. त्यामुळे वेग कमी करण्यासाठी महामार्ग पोलिसांनी सकारण प्रस्ताव सादर केला होता. त्याला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. 
- विजय पाटील,  अधीक्षक, महामार्ग पोलिस 

सुधारित वेगमर्यादेचे पालन सर्वच वाहनचालकांनी करण्याची गरज आहे. वेग वाढल्यामुळे वाहतूक असुरक्षित होऊन प्रवाशांच्या जिवाशी खेळ होऊ शकतो. त्यामुळे वेग कमी केला ही चांगली बाब आहे.
- संजय विद्वंस, नियमित प्रवासी 

मुळात वेगमर्यादा वाढविणेच गरजेचे नव्हते. असलेल्या वेगमर्यादेचे उल्लंघन करण्याची प्रवृत्ती बोकाळत आहे. त्यावर आता काही प्रमाणात अंकुश येऊ शकतो. वाहतुकीचा वेग वाढविण्यापेक्षा सुरक्षिततेवर अधिक भर हवा.
- तन्मय पेंडसे,  द्रुतगतीचे अभ्यासक

‘ई-सकाळ’वरील पोल 
द्रुतगती मार्गावरील वेगमर्यादा कमी करावी का, याबाबत नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी ‘ई-सकाळ’ने फेसबुकवर पोल घेतला होता. त्यात सुमारे २६० वाचक सहभागी झाले होते. त्यातील ७० टक्के नागरिकांनी वेगमर्यादा कमी करण्याचा आग्रह केला. तसेच, द्रुतगतीच्या सुरक्षिततेबाबत विविध सूचनाही केल्या होत्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: finally breaks on the highways

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: