आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

पुणे - नाभिक समाजाने समाजाची प्रदीर्घ काळ सेवा केली असूनही तो समाज आर्थिक प्रगतीपासून वंचित राहिला आहे. समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी राज्य सरकारने संत सेना महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या पुणे शाखेने केली आहे. तसेच समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा, अशी अपेक्षाही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

पुणे - नाभिक समाजाने समाजाची प्रदीर्घ काळ सेवा केली असूनही तो समाज आर्थिक प्रगतीपासून वंचित राहिला आहे. समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी राज्य सरकारने संत सेना महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या पुणे शाखेने केली आहे. तसेच समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा, अशी अपेक्षाही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

‘सकाळ’ने पुण्यातील महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आमंत्रित केली होती. संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष चंद्रशेखर जगताप, उपाध्यक्ष बाळासाहेब सांगळे, सरचिटणीस दत्तात्रेय मोरे, सचिव कुणाल काशीद, संस्थापक कृष्णकांत जगताप, पांडुरंग रसाळ, राजेंद्र आढाव, मुश्‍ताक अहमद शेख, विजय तावरे, राजेश आढाव, सचिन जाधव, सूरज ढमाले, नितीन काशीद, अविनाश पवार, संतोष वायकर, वसंतराव गाडेकर आदी उपस्थित होते. 

समाजाच्या संघटनेसाठी, आर्थिक प्रगतीसाठी आणि बलुतेदारी पद्धत मोडीत काढण्यासाठी १९८२ मध्ये महाराष्ट्र नाभिक महामंडळाची स्थापना करण्यात आली. दर निश्‍चिती, रास्त दर ठेवण्याचा प्रयत्न करणे अशा अनेक प्रश्‍नांवर तोडगा काढण्याचे काम केले. पुण्यात सुमारे ५ हजार ५०० व्यावसायिक असून, त्यापैकी साधारणतः ४००० व्यावसायिक संघटनेशी जोडलेले आहेत.

नाभिक समाजाची त्यांच्या कामावरून नेहमी अवहेलना होते, याकरिता ॲट्रॉसिटीच्या धर्तीवर स्वतंत्र कायदा करून नाभिक समाजाला संरक्षण मिळावे, तसेच पुणे जिल्ह्यात शासनाच्या वतीने वसतिगृह-अभ्यासिका उभारावी, व्यवसायातील आधुनिक प्रशिक्षणासाठी केश शिल्पी बोर्डाची स्थापना, ६० वर्षे वयापासून निवृत्तिवेतन योजना करावी, आदी मागण्या या वेळी पदाधिकाऱ्यांनी केल्या. 

रोजंदारीवर पोट चालत असल्याने नोटाबंदीचा फटका आम्हाला बसला. तसेच जीएसटीमुळे सौंदर्यप्रसाधने महागल्याने त्याचा आर्थिक बोजा आम्ही काही काळ सोसला, पण नंतर भाववाढ करावीच लागली. डिजिटल पेमेंटचा वापर आम्ही करत आहोत. परंतु शंभर टक्के त्याचा अवलंब करणे शक्‍य नसल्याचेही जगताप यांनी सांगितले. शिवाजी महाराजांचे अंगरक्षक जिवाजी महाले यांचे स्मारक प्रतापगडावर व्हावे, अशी मागणीही त्यांनी केली. 

पारंपरिक व्यवसायात परत
परंपरागत चालविण्यात येणाऱ्या नाभिकांच्या कामास आता अत्याधुनिक उपकरणांची साथ मिळू लागली आहे. आधुनिकीकरण, नव्या फॅशनप्रमाणे केशभूषा करण्याचे आधुनिक तंत्र यामुळे ग्राहक वाढू लागला असून, नवीन पिढीही आपल्या परंपरागत व्यवसायाकडे येऊ लागली आहे. ‘मी फायर ब्रिगेडची नोकरी सोडून परत आमच्या पारंपरिक व्यवसायात आलो आहे. मला या व्यवसायाला मोठं करायचं होतं, त्यामुळे सगळी अत्याधुनिक उपकरणे मी वापरत आहे,’’ असे तरुण व्यावसायिक संतोष वायकर सांगतो.

Web Title: Financial Development Corporation nabhik society