पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णालयाकडून कोरोना रुग्णांची आर्थिक लूट

गजेंद्र बडे
Sunday, 18 October 2020

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णालयाकडून कोरोना रुग्णांची अक्षरक्षः आर्थिक लूट केली जाऊ लागली आहे. यासाठी रुग्णालये अव्वाच्या सव्वा बिलांची आकारणी करू लागली आहेत. कोरोना उपचारांसाठी सरकारने निश्‍चित करून दिलेल्या दरांपेक्षा अधिक बिल देण्यात येऊ लागले आहे.

पुणे - जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णालयाकडून कोरोना रुग्णांची अक्षरक्षः आर्थिक लूट केली जाऊ लागली आहे. यासाठी रुग्णालये अव्वाच्या सव्वा बिलांची आकारणी करू लागली आहेत. कोरोना उपचारांसाठी सरकारने निश्‍चित करून दिलेल्या दरांपेक्षा अधिक बिल देण्यात येऊ लागले आहे. जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात आलेल्या या बिलांच्या लेखा परीक्षणातून ही बाब उघडकीस आली आहे. या लेखापरीक्षणामुळे विविध रुग्णालयांनी मिळून तब्बल 77 लाख 92 हजार 111 रुपये जादा बिल आकारल्याचे निदर्शनास आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जिल्हा परिषदेने हे जादा बिल तत्काळ रद्द केले आहे. शिवाय ज्या रुग्णांकडून नियमांपेक्षा अधिक बिल घेण्यात आले होते. ते बिल संबंधित रुग्णांना परत करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या निर्णयाचा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 835 रुग्णांना फायदा होणार आहे. या एकूण रुग्णांमध्ये मागील आठवड्यातील 124 रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी कोविड केअर सेंटर (सीसीसी), डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डीसीएचसी) आणि डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल (डीसीएच) कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. यापैकी डीसीएचसी आणि डीसीएचमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार केले जातात. या रुग्णालयांमध्ये उपचार करण्यासाठीचे दर राज्य सरकारने निश्‍चित करून दिलेले आहेत. प्रत्यक्षात या निश्‍चित दरांहून अधिक दराने बिलांची आकारणी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांसाठी चार डीसीएच आणि सहा डीसीएचसी रुग्णालये कार्यान्वित करण्यात आलेले आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या सर्व रुग्णालयांनी आकारणी केलेल्या बिलांची पडताळणी करण्याचा आदेश पुण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी 20 जुलै 2020 ला दिला होता. या आदेशानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रत्येकी दोन सदस्यीय दहा लेखापरीक्षण पथकांची स्थापना केली होती. या पथकांनी संबंधित रुग्णालयांना भेट देऊन प्रत्येक रुग्णनिहाय आकारण्यात आलेल्या बिलांची पडताळणी केली.

लेखापरीक्षण पथकांकडून तपासणी करण्यात आलेली बिले ही 1 ऑगस्ट ते 16 ऑक्‍टोबर 2020 या अडीच महिन्यांच्या कालावधीतील आहेत. या कालावधीतील 835 रुग्णांना मिळून विविध रुग्णालयांनी एकूण 3 कोटी 83 लाख 61 हजार 75 रुपयांचे बिल आकारले होते.

बिल लेखापरीक्षण संक्षिप्त
- कोरोनावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांची संख्या --- 10.
- बिलांची तपासणी केलेल्या रुग्णांची संख्या --- 835.
- सर्व रुग्णांसाठी आकारलेल्या बिलांची एकूण रक्कम --- 3 कोटी 83 लाख 61 हजार 75 रुपये.
- लेखापरीक्षणात आढळून आलेली जादा रक्कम --- 77 लाख 92 हजार 111 रुपये.
- जादा बिल कमी केल्यानंतरची बिलांची रक्कम --- 3 कोटी 5 लाख 68 हजार 964 रुपये.
- यापैकी चालू आठवड्यातील बिलांची संख्या --- 124.
- चालू आठवड्यातील बिलांची रक्कम --- 48 लाख 86 हजार 756.
- जादा आकारणी केलेली रक्कम --- 13 लाख 91 हजार 661 रुपये.
- जादा बिल कमी केल्यानंतरची रक्कम --- 34 लाख 95 हजार 95 रुपये.

जिल्ह्यातील रुग्णालयांकडून आकारण्यात आलेल्या कोरोना रुग्णांवरील उपचाराच्या बिलांची पडताळणी करण्यासाठी लेखापरीक्षण पथके स्थापन करण्यात आली होती. या पथकांनी 1 ऑगस्टपासून आजअखेरपर्यंतच्या सर्व बिलांची पडताळणी केली आहे. त्या पडताळणीत सुमारे 78 लाखांची जादा आकारणी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. हे जादा बिल संबंधित रुग्णांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना परत करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Financial robbery Corona patients hospital rural area Pune district