एकवीस लाखांचा दंड वसूल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

महापालिकेच्या आरोग्य विभागाने वर्षभरात प्लॅस्टिक पिशव्यांची विक्री केल्याप्रकरणी ४८६ दुकानदारांवर कारवाई करून २१ लाख पाच हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल केला. मात्र, अद्याप प्लॅस्टिकच्या पिशव्यांची विक्री सुरूच असल्याचे चित्र आहे.

पिंपरी - महापालिकेच्या आरोग्य विभागाने वर्षभरात प्लॅस्टिक पिशव्यांची विक्री केल्याप्रकरणी ४८६ दुकानदारांवर कारवाई करून २१ लाख पाच हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल केला. मात्र, अद्याप प्लॅस्टिकच्या पिशव्यांची विक्री सुरूच असल्याचे चित्र आहे.

पालिकेच्या ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’, ‘ई’, ‘फ’, ‘ग’ आणि ‘ह’ या आठ क्षेत्रीय कार्यालयांतील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली. या कारवाईअंतर्गत १७ हजार ७६४ किलो प्लॅस्टिकच्या पिशव्या, तर ४६१ किलो थर्माकोल जप्त केले. ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाने सर्वांत जास्त ११४ दुकानदारांवर, तर ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाने १८ दुकानदारांवर कारवाई केली. 

दुकानदारांवरच कारवाई होत असल्याने त्यांनी प्लॅस्टिकच्या पिशव्यांतून मालाची विक्री करणे बंद केले. ग्राहकांनी प्लॅस्टिकच्या पिशवीची मागणी केल्यास दुकानदाराकडून त्यांना पाच हजारांचा दंड भरल्याची पावती दाखविण्यात येते. काही दुकानदारांनी दर्शनी भागातील काचेवरच दंडाची पावती लावली आहे.

फेरीवाल्यांकडे तसेच भाजी मंडईमध्ये अशा पिशव्यांचा वापर सुरू आहे. अनेक फूलविक्रेतेही कॅरीबॅगमधून फुले देतात. मात्र, या विक्रेत्यांवर कारवाई होत नाही. याबाबत आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले,

‘‘विक्रेते जर प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर करताना आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.’’

नागरिक हेरंब जगताप म्हणाले, ‘‘पालिकेने विक्रेत्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पिशव्यांचा पुरवठा करणाऱ्यांवर कारवाई 
करावी. त्यामुळे या पिशव्यांच्या वापरास आळा बसेल. पिंपरी भाजी मंडईत भाजीखरेदीसाठी गेलो असताना भाजी विक्रेत्यांना जागेवरच पिशव्यांची विक्री होत असल्याचे दिसले.’

Web Title: Fine Recovery by Municipal Plastic bag Sailing Crime