दहापट दंड करण्याचा प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

रस्त्यावर बेकायदा दुकाने मांडणाऱ्यांच्या विरोधात पाऊल

पुणे - रस्त्यावर बेकायदा दुकाने मांडून अतिक्रमण करणाऱ्याच्या दंडाच्या रकमेत आता दहापट वाढ करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. अशा व्यावसायिकांकडून पाच ते ३५ हजार रुपयांपर्यंत दंड वसूल केला जाणार असून, यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडण्यात येणार आहे. दंडाच्या रकमेत वाढ केल्याने अतिक्रमणे करणाऱ्यांवर वचक बसण्याची आशा महापालिका प्रशासनाला आहे. 

वर्दळीच्या रस्त्यांवर बेकायदा हातगाडी पथारी आणि फेरीवाल्यांना बंदी असताना अनेक रस्त्यांवर सर्रास अतिक्रमणे झाली आहेत. अशा व्यावसायिकांवर कारवाई करून महापालिकेच्या वतीने त्यांना दंड केला जातो. सध्या पाचशे ते पाच हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येतो. मात्र, ही रक्कम फारच कमी असल्याने कारवाईनंतर पुन्हा दुकाने थाटली जात असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमीवर छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना धडा शिकविण्यासाठी दंडाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यानुसार अतिक्रमणाचे स्वरूप आणि त्यासाठी व्यापलेल्या जागेचा विचार करून दंडाची रक्कम ठरविण्यात आली आहे. त्यात हातगाडी व्यावसायिकांना पाच हजार, तर अवजड वाहनांकरिता ३५ हजार रुपये दंड असेल, असे प्रस्तावात म्हटले आहे. 

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या प्रमुख संध्या गागरे म्हणाल्या, ‘‘अतिक्रमणविरोधी कारवाईत संबंधितांचे साहित्य ताब्यात घेतले जाते. ठराविक दंड आकारून ते परत दिले जाते. मुळात, दंडाची रक्कम कमी असल्याने अतिक्रमणे होतात. त्यात छोट्या व्यावसायिकांचा सर्वाधिक समावेश आहे. दंडाच्या रकमेत वाढ केल्यास अतिक्रमणे होणार नाहीत. त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव नव्याने तयार केला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर लगेचच अंमलबजावणी सुरू केली जाईल.’’

चौका चौकात अतिक्रमणे
महापालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत प्रभागरचना बदल्याने या काळात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. नव्या प्रभागानुसारच्या हद्दीमुळे चौका-चौकात हातगाड्या आणि पथारी व्यावसायिकांची संख्या वाढली आहे. या व्यावसायिकांवर प्राधान्याने कारवाई करण्यात येणार असल्याचेही महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून सांगण्यात आले.

Web Title: fineproposal for hockers