नोटा बदलून घेणाऱ्यांच्या बोटावर शाई

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

पुणे - नोटा बदलून घेण्यासाठी टपाल कार्यालयापुढे लागलेल्या रांगेत केवळ गरजू नागरिकच नव्हे; तर काळा पैसा पांढरा करण्यासाठी भाडोत्री लोकांनीही रांगेत उभे करण्यास सुरवात केली आहे. त्यावर पर्याय म्हणून पैसे बदलून घेणाऱ्या नागरिकांच्या बोटावर उद्यापासून (ता. 16) मतदानाप्रमाणे शाई लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे - नोटा बदलून घेण्यासाठी टपाल कार्यालयापुढे लागलेल्या रांगेत केवळ गरजू नागरिकच नव्हे; तर काळा पैसा पांढरा करण्यासाठी भाडोत्री लोकांनीही रांगेत उभे करण्यास सुरवात केली आहे. त्यावर पर्याय म्हणून पैसे बदलून घेणाऱ्या नागरिकांच्या बोटावर उद्यापासून (ता. 16) मतदानाप्रमाणे शाई लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी टपाल कार्यालयापुढे सध्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत. जीपीओ आणि सिटी पोस्टात सर्वाधिक गर्दी असल्याचे दिसत आहे. गेल्या चार दिवसांत टपाल कार्यालयातून सुमारे बारा हजार नागरिकांनी नोटा बदलून नेल्या आहेत. जीपीओ येथून दररोज सुमारे अकराशे ते बाराशे नागरिकांना नोटा बदलून देण्यात येत आहेत. दरम्यान, नोटा बदलण्यासाठी आलेल्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करून आणि चॉकलेटने तोंड गोड करून दिलासा देण्याचा प्रयत्न टपाल विभागाकडून करण्यात आला आहे. तसेच दिव्यांग आणि वयोवृद्ध नागरिकांना नोटा बदलण्यासाठी प्राधान्य देण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोस्टमास्टर आर. एस. गायकवाड यांनी दिली.
शहरातील 113 टपाल कार्यालयांतून नोटा बदलून देण्याचे काम सुरू आहे. ससून रुग्णालयात दोन, तर बुधरानी रुग्णालयात एक काउंटर सुरू करण्यात आले आहे. तसेच मंगळवारपासून रेल्वे विभागातील कर्मचाऱ्यांसाठी एक काउंटर सुरू करण्यात आल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.

दरम्यान, शहरातील विविध टपाल कार्यालयात जमा झालेल्या नोटांपैकी अनेक नोटा बनावट असल्याचे नंतर केलेल्या तपासणीत आढळून आले आहे. या नोटा जेथून जमा करण्यात आल्या त्या कार्यालयाकडे पाठवून संबंधितांना पुन्हा देण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोस्टमास्टर आर. एस. गायकवाड यांनी सांगितले.

बचत खात्यांच्या संख्येत वाढ
हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा रद्द केल्यामुळे जवळ असलेल्या नोटा जमा करण्यासाठी अनेक नागरिकांनी टपाल कार्यालयाचा पर्याय निवडला आहे. त्यासाठी गेल्या चार दिवसांत दररोज नव्याने खाते उघडणाऱ्यांची संख्या दुप्पट झाल्याची माहिती वरिष्ठ पोस्टमास्टर आर. एस. गायकवाड यांनी दिली. यापूर्वी दररोज सरासरी सुमारे पंचवीस बचत खाती उघडण्यात येत होती. ही संख्या आता पन्नासवर गेली आहे. खाते उघडण्यासाठी कोणतीही अनामत रक्कम भरावी लागत नाही. तसेच एकदा खाते उघडल्यानंतर लगेचच त्या खात्यात टाकलेल्या रकमेपैकी 24 हजार रुपये काढता येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे अधिकाधिक लोकांना टपाल विभागात बचत खाते उघडण्याचे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Finger, changing the currency of the buyer ink