‘विघ्नहर’ कारखान्याच्या 32व्या गळीत हंगामाची सांगता

junnar
junnar

जुन्नर (पुणे) : येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या दीर्घ काळ चाललेल्या ३२ व्या गाळप हंगामाची आज सोमवारी (ता.14) यशस्वी सांगता झाली. यावेळी उपाध्यक्ष अशोक घोलप, सर्व संचालक मंडळ सदस्य, ऊस तोडणी कामगार, तोडणी मुकादम, ऊस वाहतूक चालक-मालक, विघ्नहर कारखान्याचे सर्व अधिकारी वर्ग व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सांगता सभेत सत्यशिल शेरकर म्हणाले, यंदाच्या गाळप हंगामात आपले कारखाना कार्यक्षेत्रात सुमारे २१ हजार ४५५ एकर ऊस उपलब्ध होता. संचालक मंडळाने योग्य नियोजन करून कार्यक्षेत्रातील सर्व नोंद केलेला व बिगरनोंद असलेल्या ऊसाचे गाळप केले  आहे. ते म्हणाले, मागील वर्षी चांगल्या पर्जन्यमानामुळे ऊसाचे एकरी उत्पादनामध्ये वाढ होऊन संपूर्ण देशामध्ये विक्रमी असे ३२० लाख मे.टन एवढे साखरेचे उत्पादन झाले. मागील वर्षी ते २०० लाख मे.टन इतके झाले होते. म्हणजेच यंदा सुमारे १२० मे.टन एवढे जास्त उत्पादन झाले. त्याचा परिणाम साखरेचे दर मोठ्या प्रमाणावर खाली आले.

आज २४५० ते २५०० प्रतिक्विंटल इतक्या दरात साखर विकली जात आहे. तरीही साखर उचलली जात नाही. सरकारने एक्स्पोर्ट करण्यास परवानगी दिली. परंतू जागतिक बाजारपेठेत साखरेचे दर कमी असलेमुळे आपल्या साखरेला एक्स्पोर्टसाठी १८०० ते १९०० प्रतिक्विंटल इतका दर मिळत आहे. तो परवडणारा नाही. उत्पादन खर्चापेक्षा साखरेचे दर खाली आल्याने तसेच उपपदार्थांचे दरही कमालीचे कोसळलेने FRP पेमेंट, तोडणी वाहतूक पेमेंट, कामगार पगार करणे जिकीरीचे झाले आहे. अशाही परिस्थितीमध्ये ऊसाचे, तोडणी वाहतूक, कामगारांचे पगार आदी पेमेंट वेळेवर करण्याचा प्रयत्न कारखान्याने केला आहे. केंद्र व राज्य शासनाने साखर धंद्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. या साखरधंद्यावर शेतकरी, कामगार, तोडणी/वाहतूकदार अशा अनेक घटकांचे प्रपंच अवलंबून आहेत. साखर धंद्याची परिस्थिती अशीच राहिली तर त्याचा फार मोठा परिणाम या घटकांवर होणार असल्याचे  त्यांनी सांगितले.

उपाध्यक्ष अशोक घोलप म्हणाले , कारखान्याचा गळीत हंगाम अतिशय चांगल्याप्रकारे संपन्न झाला. गळीत हंगामाकरिता सर्व घटकांचे योगदान अतिशय मोलाचे ठरत असल्याने मी सर्वांना धन्यवाद देऊन आभार मानतो.  कार्यस्थळावर तज्ञ संचालक किरण तट्टू आणि त्यांच्या सुविद्यपत्नी शुभांगी  यांचे  हस्ते श्री सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या वर्षात सेवानिवृत्त झालेल्या एकूण २८ कामगारांचा अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकाच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन तसेच फेटा बांधून सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन कार्यकारी संचालक राजेंद्र जंगले यांनी केले तर आभार संचालक धनंजय डुंबरे यांनी मानले.

"विघ्नहरने संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाचे गाळप व साखर उत्पादन करून सुद्धा साखरेचे व उपपदार्थांचे कोसळलेले बाजारभाव यामुळे साखर कारखानदारी मोठ्या आर्थिक संकटात सापडली असून पुढील वर्षीचा गाळप हंगाम सुरु करणेसाठी मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होणार आहेत," अशी खंत  शेरकर यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com