बारामतीत इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सेसच्या शोरुमला आग; साहित्य जळून खाक

fir-in-baramati.jpg
fir-in-baramati.jpg

बारामती : येथील भिगवण रस्त्यावरील महालक्ष्मी इलेक्ट्रॉनिक्स या शोरुमला आज सकाळी सव्वादहाच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सेसच्या शोरुममधील साहित्य जळून खाक झाले. आगीचे नेमके कारण अजूनही अस्पष्ट आहे. 

भिगवण रस्त्यावरील सेवा रस्त्यावर हे शोरुम असून सकाळी रस्त्यावरुन जाणाऱ्या काही जणांना आतून धूर येत असल्याचे दिसले. त्यांनी या बाबत मालकांना कळविण्यापूर्वीच आगीने रौद्र रुप धारण केले होते. काही क्षणातच आगीच्या ज्वाळा आकाशाकडे झेपावू लागल्या व धुराचे लोट बाहेर पडू लागले होते.  या शोरुममध्ये असलेले टीव्ही, रेफ्रिजेटर्स, एअरकंडीशनर्स, मायक्रोओव्हन, पंखे, मिक्सर, कूलर्स, म्युझिक सिस्टिम अशा अनेक वस्तू जळून खाक झाल्या. 

बारामती नगरपालिका, एमआयडीसीच्या अग्निशामक दलाच्या बंबांनी ही आग तासाभराच्या प्रयत्नानंतर आटोक्यात आणली. या आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असल्याची शक्यता आहे. नुकसानीचा नेमका आकडा समजू शकला नसला तरी शोरुम व त्या मागे असलेल्या गोदामापर्यंत आग भडकलेली असल्याने नुकसानीची तीव्रता अधिक होती. 

त्रुटीची जाणीव पुन्हा एकदा....
बारामती नगरपालिकेचा अग्निशामक दलाचा बंब व एमआयडीसीचा बंब यातील फरक आज पुन्हा एकदा अधोरेखीत झाला. एमआयडीसीचा अग्निशामक दलाचा बंब सर्व साधनांनी सज्ज असा होता, कर्मचारी प्रशिक्षित होते व गणवेशासह आवश्यक बाबी त्यांच्याकडे होत्या. दुसऱ्या बाजूला नगरपालिकेचे कर्मचारी प्रशिक्षण नसलेले, साधनांचा अभाव असलेले होते, मात्र तरीही या कर्मचाऱ्यांनी जिवाची बाजी लावून ही आग आटोक्यात आणली. मात्र आगीमुळे निर्माण झालेल्या धुरापासून तसेच आगीपासून बचाव करण्यासाठी कसलीही साधने नगरपालिकेकडून या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली नाहीत. दरवेळेस आग लागली की, या विषयाची चर्चा होते. नगरपालिका या बाबत काहीही करत नाही, हे चक्र कायमच सुरु आहे. 

दरम्यान, या आगीचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या दीपक पडकर यांना एका पोलिस अधिकाऱ्याने विनाकारण धक्काबुक्की केल्याचाही प्रकार घडला. या बाबत पत्रकारांनी वरिष्ठांना भेटून या घटनेचा निषेध नोंदविला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com