जिवावर बेतणारा रोजगार काय कामाचा ?

Fire123
Fire123

कुरकुंभ (पुणे) : कुरकुंभ (ता. दौंड) औद्योगिक वसाहतीतील अल्काईल अमाईन्स केमिकल्स लिमिटेड कंपनीत 14 ऑगस्ट रोजी लागलेल्या भीषण आगीमुळे परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रोजगार नको; पण धोकादायक कंपनी बंद करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी संतप्त ग्रामस्थ व महिलांकडून होत आहे.

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील अल्काईल अमाईन्स कंपनीत बुधवारी रात्री दहाच्या सुमारास भीषण आग लागली. आगीमुळे मोठ्या प्रमाणात आगीचे व धुराचे लोट बाहेर पडून जोरजोरात स्फोट होत होते. त्यामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या कंपनीमध्ये उत्पादन प्रक्रियेसाठी अत्यंत धोकादायक व ज्वलनशील रसायन वापरले जात असल्याने परिसरात दहा किलोमीटर अंतरापर्यंत लोकांच्या जीवितास धोका संभवतो, अशी अफवा पसरली होती. या अफवेमुळे कुरकुंभ, पांढरेवाडी, मळद, जिरेगाव, गोपाळवाडी, गिरीम या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही ग्रामस्थ व महिलांनी लहान मुलांसह गाव सोडून रात्रीच्या अंधारात दहा ते वीस किलोमीटर अंतरावरील गावांमध्ये निघून गेले होते, तर कुरकुंभ, पांढरेवाडीतील ग्रामस्थ, औद्योगिक वसाहतीतील परप्रांतीय कामगार लहान मुलांना घेऊन जीव वाचविण्यासाठी मिळेल त्या वाहनांनी किंवा पायी सैरभैर पळत सुटले होते. आगीतून बाहेर पडणाऱ्या वायू व धुरामुळे लहान मुले, महिला, ग्रामस्थांना डोकेदुखी, मळमळ, डोळ्यांची जळजळ, श्‍वसनाचा त्रास सहन करावा लागला होता.

अफवांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात गोंधळ उडूनही कंपनी व्यवस्थापन, प्रशासन व पोलिसांचा निष्काळजीपणा दिसून आला. लोकांमध्ये निर्माण झालेली भीती कमी करण्यासाठी घटनेचा नेमका धोका आहे किंवा नाही याबाबत अधिकृत माहिती ग्रामस्थांना मिळत नसल्याने गोंधळात आणखी भर पडली. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास लागलेली आग रात्री एकच्या सुमारास आटोक्‍यात आणण्यात औद्योगिक वसाहतीतील व बाहेरून आलेल्या अग्निशामक दलांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना यश आले. ही आग कंपनीचे उत्पादन सुरू असलेल्या मुख्य विभागापासून काही अंतरावर असलेल्या रसायनाच्या साठ्याला न लागल्याने मोठा अनर्थ टळला. आग विझविण्यात यश आले असले तरी, लोकांच्या मनामध्ये आजही भीतीचे वातावरण कायम आहे. लोकांमधील भीती कमी करण्यासाठी अजूनही कंपनी व्यवस्थापन, प्रशासन व पोलिसांनी ठोस उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही.

अल्काईल कंपनीतील आगीमुळे औद्योगिक वसाहतीतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कंपनी उत्पादनासाठी धोकादायक रसायनाचा वापर होत असूनही सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष करीत आहेत. कंपनीच्या निष्काळजीपणामुळे ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. आम्हाला रोजगार नाही मिळाला तरी चालेल; पण सरकारने ही धोकादायक कंपनी त्वरित बंद करण्याची मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली.


चौकशी करून गुन्ह्यासंदर्भात निर्णय
या आगीत सुदैवाने कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. आगीत केमिकलचे बॅरल इतर साठा जळून खाक झाला. मात्र, आगीचे नेमके कारण व नुकसानीची आकडेवारी चौकशी केल्यानंतर समजेल. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांमुळे धोका टळला असून सुरक्षेतील त्रुटी दुरुस्त केल्या जातील, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आगीच्या घटनेची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com