पुणे : स्वयंपाक करताना गॅसगळतीमुळे आग; महिलेसह मुलगा भाजला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

सिलिंडर बदलल्यानंतर स्वयंपाक करीत असताना गॅसगळती होऊ लागलेल्या आगीमध्ये एक महिला भाजली. तर तिला वाचविण्यासाठी धावलेला तिचा मुलगाही किरकोळ भाजला.

पुणे : सिलिंडर बदलल्यानंतर स्वयंपाक करीत असताना गॅसगळती होऊ लागलेल्या आगीमध्ये एक महिला भाजली. तर तिला वाचविण्यासाठी धावलेला तिचा मुलगाही किरकोळ भाजला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ धाव घेऊन आग आटोक्यात आणल्याने सिलिंडरचा स्फोट होण्याची मोठी घटना टळली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी कोथरुड परिसरामध्ये घडली. 

अर्चना चंद्रकांत निसळ (वय 68, रा.सुरजननगर हौसिंग सोसायटी, कोथरुड) व आशिष चंद्रकांत निसळ (वय 39) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निसळ कुटुंबीय सुरजनगर सोसायटीच्या चौथ्या मजल्यावर राहतात. शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरातील स्वयंपाकाचा गॅस संपला. त्यामुळे त्यांनी तत्काळ दुसरा सिलेंडर जोडून स्वयंपाक करण्यास सुरवात केली. त्याचवेळी सिलेंडरचे रेग्युलेटर नीट न बसल्यामुळे तेथून गॅस गळती सुरू झाली.

दरम्यान, गॅस हवेत पसरला, त्याचवेळी स्वयंपाक सुरू असल्याने गॅसने पेट घेतला. त्यामुळे अर्चना निसळ यांच्या साडीने पेट घेतल्याने त्या भाजल्या. निसळ यांचा मुलगा आशिष त्यांना वाचविण्यासाठी धावत आला. त्याने आईला बाहेर काढले, त्यावेळी त्याच्याही हाताला भाजले. तर घरातील अन्य व्यक्तींनी अग्निशमन दलास माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गॅस सिलेंडरवर पाणी मारुन आग आटोक्यात आणली. तापलेला सिलिंडर थंड केल्यानंतर बाहेर काढला.

सिलेंडरचा स्फोट न झाल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. कोथरूड अग्निशमन केंद्राचे प्रमुख गजानन पाथरुडकर, राजेश कुलकर्णी, पंढरीनाथ उभे, विनय सुतार यांच्या पथकाने आग आटोक्यात आणली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fire in Pune Due to Gas Leak One Woman and Her son Burn