दुकानांमधील आगीचा प्रश्‍न ऐरणीवर 

दुकानांमधील आगीचा प्रश्‍न ऐरणीवर 

पुणे - शहराच्या मध्य वस्तीमधील वेगवेगळ्या दुकानांमध्ये आग लागण्याच्या घटना सातत्याने घडू लागल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांत मध्यवर्ती भागातील पेठांमधील दुकानांना आग लागण्याचे तीन प्रकार घडले आहेत. व्यावसायिक वापरासाठी बांधकामे वाढविली जात असताना अग्निशामक उपकरणांबाबतच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्यामुळे तेथील कामगारांसह रहिवाशांची सुरक्षितता धोक्‍यात आली आहे. 

शहराच्या उपनगरांसह मध्यवस्तीमधील निवासी इमारतींमध्ये गाळे, दुकाने व गोदामे आहेत. त्यामध्ये विविध प्रकारचे व्यवसायही सुरू आहेत. या व्यावसायिकांकडून अनेकदा परस्पर वाढीव बांधकामे केली जातात. त्या वेळी तेथे अग्निशामक उकरणे बसविण्यात येत नाहीत. त्याबाबत महापालिका अथवा पोलिसांकडून तपासणी होत नाही. त्यासाठी तपासणी करणारी कोणतीही यंत्रणा नाही. 

नियमानुसार 15 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या दुकानांत अग्निशामक उपकरणे सक्तीची आहेत. त्यापेक्षा कमी उंचीच्या दुकानांनाही अग्निशामक यंत्रणा बसविण्यासाठी संबंधित रहिवाशांनी आग्रही राहिल्यास आगीसारख्या घटना टाळता येतील, असे अग्निशमन दलाचे म्हणणे आहे. परंतु, त्याबाबत उपाययोजना होत नसल्यामुळे कामगारांसह रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न कायम आहे. अनेक दुकानांमध्ये ज्वलनशील पदार्थ, रसायने, आग झपाट्याने वाढेल अशा वस्तू असतात. मात्र, त्याविषयी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना माहिती नसते. संबंधित दुकानदारांकडे व्यावसायिक परवाने, ना हरकत प्रमाणपत्रे आहेत की नाहीत, याचीही पाहणी होत नसल्याची माहिती पुढे आली आहे. 

शहर परिसरात घडलेल्या आगीच्या घटना 
7 मार्च ः सदाशिव पेठ ः औषधांचे दुकान आणि गोदामाला आग 
15 एप्रिल ः कसबा पेठ ः सायकलींच्या गोदामाला आग 
8 मे ः उरुळी देवाची ः साडीच्या दुकानाला आग लागून पाच कामगारांचा मृत्यू 
12 मे ः खडकी बाजार ः एक्‍सेल्सियर कॉम्प्लेक्‍स इमारतीतील आगीत साडी आणि मोबाईल संचविक्रीचे दुकान खाक 

काय काळजी घेता येईल? 
- दुकाने, गोदामांमध्ये अग्निशामक उपकरणे, सामग्री ठेवावी 
- ज्वलनशील पदार्थ, रसायने, वस्तू ठेवू नयेत 
- वायरिंगची नियमित तपासणी करावी 
- दुकानांमध्ये स्मोक डिटेक्‍टर, हीट डिटेक्‍टर बसवावे 
- अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त "फायर बॉल' बसवावे 

निवासी इमारतींमधील दुकानांमध्ये योग्य प्रकारच्या अग्निशामक यंत्रणा बसविणे आवश्‍यक आहे. ठरावीक व्यवसायांसाठी अग्निशमन "ना हरकत प्रमाणपत्र' देते. परंतु, किराणा माल, कपड्यांच्या दुकानांना आग लागू नये, यासाठी दुकानदारांसह इमारतीमधील रहिवाशांनीही जागरूक राहिले पाहिजे. 
- प्रशांत रणपिसे, प्रमुख, अग्निशमन दल 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com