दुकानाबाहेर पडण्याची धडपड कुलपानं रोखली! (व्हिडिओ)

दुकानाबाहेर पडण्याची धडपड कुलपानं रोखली! (व्हिडिओ)

पुणे -  नुसताच विटांचा थर, त्यावर सिमेंटचा मुलामा, चहूबाजूंनी ३५ फूट उंचीच्या भिंतींचा सांगाडा, फुटाचीही खिडकी नसलेल्या भपक्‍याआड दडलेल्या या ‘आलिशान शोरूम’चं छतही लोखंडी पत्र्यांचंच... अशा पोकळ; मात्र बाहेरून आलिशान वाटणाऱ्या शोरूममध्ये पाच निष्पापांचा दम तुटला. अर्थात, तो त्यांना तोडावाच लागला. जिवाच्या आकांतानं किंकाळ्या फोडत, धुराचे लोट बाजूला सारत कामगारांनी कशीबशी दुकानाबाहेर पडण्याची वाटही शोधली. पण, ती दारावरच्या ‘कुलपा’नं रोखली..!

राज्याच्या सीमा ओलांडून; म्हणजे राजस्थानातून पुणे गाठलेल्या राकेश, सूरज, राकेश, धर्मराज आणि लातूरच्या धीरजला गाढ झोपेत आगीनं आपल्या कवेत घेतलं ते कायमचंच. ही घटना घडताच आग, तिचं कारण आणि ज्या पाच जिवांनी जिथं आक्रोश केला; त्या ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी केली तेव्हा शोरूममालकांचा बेजबाबदारपणा मृत्यूला कारणीभूत असल्याचं उघड झालं. दुकानात दिवसभरात राबवून घ्यायचं आणि त्यांच्याकडंच रात्री राखणदारीचं काम सोपवायचं, या दुकानमालकाच्या सोयीमुळंच हे अक्रीत घडलं.

जागेची सहज उपलब्धता, तिचा भाव, भाडं आणि पूर्वी असलेला जकात कर चुकविण्याच्या उद्देशानं शहरातील कापड व्यावसायिकांनी उरुळी देवाची, फुरसुंगी गावात गोदामे उभारली. याच गोदामांना दिखाऊपणाचं कोंदण देत ‘शोरूम’ असं नाव दिलं गेलं. नेमकं हेच चित्र तब्बल १४ हजार चौरस फुटांच्या ‘राजयोग’ या साडीच्या शोरूममध्ये पाहायला मिळालं. 

ही शोरूम आलिशान वाटत असली, तरीही बांधकाम मात्र कच्चं असल्याचं भिंत फोडल्यानंतर उघड झालं. शोरूमला साजेशी अशी एकही बाब आत कुठंच दिसली नाही. तिथं दिसली ती मालकासाठीची आलिशान ‘केबिन’.  

इमारती असुरक्षित 
या व्यावसायिकांची मागणी लक्षात घेऊन फुरसुंगी आणि उरुळी देवाची ग्रामस्थांनी आपल्या घराच्या अंगणातच भलीमोठी दुकानं बांधली. आधी ग्रामपंचायत आणि आता महापालिकेची नजर चुकवून गावकऱ्यांनी बेकायदा इमले चढविले. अशा इमारतींच्या बांधकामाचा दर्जा न राखल्यानं त्या असुरक्षित असल्याचं दिसून येतं. मात्र, ग्रामपंचायतीपासून महापालिकेच्या अधिकाऱ्यांची मर्जी सांभाळल्यानं ही बेकायदा बांधकामं कोणाच्या नजरेत आली  नाहीत.

बाहेरून कुलपाचा उपाय ठरला जीवघेणा
या दोन्ही गावांतील कपड्यांच्या शोरूमध्ये दिवसाढवळ्या चोरीच्या घटना घडत असल्याने येथील बहुतांश व्यावसायिकांनी कामगारांच्या राहण्याची व्यवस्था दुकानातच केली आहे. कामगारांना किमान सुविधा पुरवून त्यांची काळजी घेतली जात असल्याचं व्यावसायिक सांगत आहेत. पण, दुकानाच्या सुरक्षिततेची जबाबदारीही याच कामगारांकडं सोपवून दुकानाला बाहेरून कुलूप लावण्याचा उपाय शोधला आहे. दुकानाचं स्वरूप, त्यातील साहित्य आणि अनुचित घटनांच्या पार्श्‍वभूमीवर हा उपाय जीवघेणा ठरल्याचं स्पष्ट झालं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com