
Pune News : नायलॉन मांजाने गळा चिरल्यामुळे अग्निशमन जवान गंभीर जखमी
पुणे : दुचाकीवरून जात असताना अग्निशमन दलातील जवानाचा नायलॉन मांजाने गळा चिरल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या गळ्याला १५ टाके पडले असून, सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.
ही घटना डायस प्लॉट येथील नवीन उड्डाणपुलावर मंगळवारी घडली. नवनाथ मांढरे असे जखमी झालेल्या जवानाचे नाव आहे. ते मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास भवानी पेठेतील मध्यवर्ती अग्निशमन दलाच्या केंद्रात आले होते. तेथून ते ड्युटीसाठी कोंढवा येथे दुचाकीवर जात होते.
ते डायस प्लॉट येथील नवीन उड्डाणपुलावर आल्यानंतर त्यांच्या गळ्याला नॉयलॉन मांजा अडकून त्यांचा गळा कापला गेला. रक्तस्राव होत असतानाही अशा परिस्थितीत त्यांनी स्वत: उठून तो मांजा तोडून टाकला. स्वत:ला सावरून त्यांनी भावाला आणि त्यांचे अग्निशमन दलातील सहकारी गणेश ससाणे यांना फोन केला.
त्यांनी रक्तस्राव थांबविण्यासाठी गाडीतील फडके काढून गळ्याला बांधले. त्यांना काही सुचत नसल्याने ते धनकवडीत बहिणीच्या घरी गेले. तेवढ्यात ससाणे हे धनकवडीत पोचले. त्यांनी मांढरे यांना तातडीने बिबवेवाडीतील इएसआयसी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या गळ्याला गंभीर जखम झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
नायलॉन मांजामुळे पुणे-सातारा रोडवरील शंकर महाराज उड्डाणपुलावर दोन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली होती. नॉयलॉन मांजावर बंदी असतानाही पतंग उडविण्यासाठी नॉयलॉन मांजाचा वापर केला जात आहे. त्यामुळे नागरिकांसोबतच पक्षांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.