विद्यापीठ चौकात पिस्तुलातून गोळीबार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोरील चौकात आज सकाळी अकराला एकाने पिस्तुलातून गोळीबार केल्याने एक जण जखमी झाला. भर दिवसा वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने खळबळ उडाली. हिंजवडी पोलिसांनी नाकाबंदी करून, संशयित आरोपीस काही तासांतच जेरबंद केले.

पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोरील चौकात आज सकाळी अकराला एकाने पिस्तुलातून गोळीबार केल्याने एक जण जखमी झाला. भर दिवसा वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने खळबळ उडाली. हिंजवडी पोलिसांनी नाकाबंदी करून, संशयित आरोपीस काही तासांतच जेरबंद केले.

समीर किसन येनपुरे (वय 38, रा. मेहेंदळे गॅरेज, एरंडवणे) असे जखमीचे नाव आहे; तर शुक्राचार्य मदाळे (वय 35, रा. एरंडवणे) असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी दिलेल्या माहितीनुसार, येनपुरे व मदाळे हे दोघेही एरंडवणे परिसरात राहतात. येनपुरे यांचा बोर्ड व फ्लेक्‍स लावण्याचा व्यवसाय आहे. मदाळे याचा एरंडवण्यात पानाचा स्टॉल आहे. काही दिवसांपूर्वी मदाळे याचा स्टॉल महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हटवला होता. येनपुरे याच्या तक्रारीमुळेच स्टॉल काढल्याचा मदाळे याचा समज झाला होता. त्यामुळे त्यांना संपविण्याचा त्याने कट रचला.

शनिवारी सकाळी येनपुरे हे कामानिमित्त सेनापती बापट रस्त्यावरून पुणे विद्यापीठाच्या दिशेने जात होते. चौकामध्ये सिग्नलला त्यांची गाडी थांबली असता, पाठीमागून दुचाकीवर आलेल्या मदाळे याने देशी बनावटीच्या पिस्तुलातून येनपुरे यांच्या डोक्‍यात गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही गोळी त्यांच्या डोक्‍याला चाटून गेली. गोळीबाराच्या घटनेमुळे नागरिकांमध्येही गोंधळ उडाला. त्याचा फायदा घेऊन मदाळे हा तेथून सांगवीच्या दिशेने पसार झाला. नागरिक व पोलिसांनी येनपुरे यांना तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील हिंजवडी पोलिसांनी नाकाबंदी करून, आरोपीस तत्काळ ताब्यात घेतले.

पिस्तूल सहजासहजी उपलब्ध 
पूर्ववैमनस्यातून किंवा दोन गटांमधील भांडणातून एकमेकांना संपविण्यासाठी आतापर्यंत शहरात देशी बनावटीच्या पिस्तुलांचा वापर होत असे. परंतु शनिवारी घडलेल्या घटनेमुळे किरकोळ कारणासाठीही आता थेट पिस्तुलाचा वापर करण्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांकडून सातत्याने सराईत गुन्हेगार, तस्करी करणारे, चोऱ्या करणाऱ्यांकडून पिस्तूल जप्त केले जातात. परंतु हे हत्यार सहजासहजी उपलब्ध होऊ लागल्यामुळे त्याचा सर्रासपणे वापर होत असल्याची सद्यःस्थिती आहे. 

Web Title: Firing from pistol at University Chowk pune