सराफ दुकान फोडण्याचा डाव उधळणाऱ्या पोलिसांवर चोरट्यांचा गोळीबार

सराफ दुकान फोडण्याचा डाव उधळणाऱ्या पोलिसांवर चोरट्यांचा गोळीबार

पुणे : सराफी दुकान फोडून लाखो रुपयांचा ऐवज चोरण्याचा चोरट्यांचा डाव रात्रगस्तीवरील पोलिसांनी उधळून लावला. दरम्यान, चोरट्यांनी पोलिसांवर गोळीबार केल्यानंतरही पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला, मात्र अंधाराचा फायदा घेत चोरटे पळून गेले. सुदैवाने, गोळीबारात पोलिस कर्मचाऱ्यांना कोणतीही इजा झाली नाही. ही घटना गुरुवारी पहाटे चार वाजता बोपोडी येथील भाऊ पाटील रस्त्यावर घडली. 

याप्रकरणी माधव गोपनकर यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी गोपनर व त्यांचे सहकारी स्वप्नील घोलप हे दोघेही गुरुवारी पहाटे बोपोडी येथे रात्रगस्तीवर होते. पहाटे चारच्या सुमारास दोघेही बोपोडी येथील भाऊ पाटील रस्त्यावरील रविराज हाइट्‌स इमारतीमधील श्री वर्धमान ज्वेलर्स या दुकानासमोर आले. त्या वेळी त्यांना दुकानासमोर एक इनोव्हा गाडी संशयास्पदरीत्या थांबलेली दिसली. गाडीमध्ये चालक व त्यांच्याशेजारी एक जण असे दोघे जण होते, तर अन्य तिघेजण दुकानाचे शटर उचकटून आतील वस्तू बाहेर आणत होते. त्यामध्ये आठ लाकडी ड्रॉव्हरसह सोन्या-चांदीचे दागिने, 20 हजार रुपयांची रोख रक्कम, शिक्के व वेगवेगळ्या वस्तू गाडीमध्ये भरण्याचा प्रयत्न करत होते. 

दरम्यान, गोपनर व घोलप हे पोलिस घटनास्थळी आल्याचे पाहून चालकाने गाडी पळविण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला, मात्र ते पळून जाण्यात यशस्वी झाले. त्याच वेळी पोलिसांनी पाठीमागे येऊन अन्य तिघांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी तिघांपैकी एकाने त्याच्याजवळील पिस्तूल काढले आणि घोलप यांच्या दिशेने पिस्तूल रोखून "आगे मत बढो, नहीं तो जान से मार दूँगा' असे ओरडत दोन गोळ्या झाडत त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी एक गोळी घोलप यांनी चुकविली, तर दुसरी गोळी अन्यत्र उडाली. त्यानंतर अन्य तिघेही अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. 
 
पहाटे सराफी दुकान फोडण्याचा प्रकार बोपोडीमध्ये यापूर्वीही झाला आहे. त्या वेळीही एका पोलिस कर्मचाऱ्यावर चोरट्यांनी गोळीबार केल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. 

"इनोव्हातील पाच जणांचा सराफी दुकानामध्ये चोरीच्या प्रयत्नात होता. मात्र बीटमार्शल घोलप व गोपनर यांनी त्यांचा प्रयत्न उधळून लावला. त्यामध्ये चोरट्यांनी पोलिसांवर गोळ्या झाडल्या. मात्र दोघांनाही कोणतीही इजा झाली नाही. पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला असून चोरट्यांचा शोध सुरू आहे.'' 
- शफीक पठाण, पोलिस निरीक्षक (गुन्हे), खडकी पोलिस ठाणे. 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com