राष्ट्रवादीची पहिली यादी महिनाअखेर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

पुणे - महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून, प्रचारात आघाडी घेण्यासाठी महिनाअखेरीला पक्षाच्या उमेदवारांची नावे जाहीर होणार असल्याचे पक्षातील सूत्रांकडून गुरुवारी सांगण्यात आले. विरोधकांकडून कोणते उमेदवार पुढे येणार? याचा अंदाज घेऊन तेवढ्याच ताकदीचे उमेदवार रिंगणात उतरविण्याची व्यूहरचना राष्ट्रवादीने आखली आहे. 

महापालिकाच्या निवडणुकीची प्रारूप प्रभागरचना, त्यातील आरक्षणे आणि त्या-त्या प्रभागांमधील संभाव्य उमेदवारांच्या नावांचा पक्षाकडून आढावा घेण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पक्षाचे नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक महापौर बंगल्यात गुरुवारी झाली. त्यात इच्छुकांच्या नावांबाबत चर्चा झाली. 
महापालिकेतील सत्ता कायम राखण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आत्तापासून मोर्चेबांधणी केली जात आहे. विरोधकांचे विशेषतः भाजपचे आव्हान मोडित काढण्यासाठी ही निवडणूक सर्व ताकदीनिशी लढण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्या दृष्टीने शक्‍य त्या प्रभागांमधील उमेदवारांची नावे निवडणुकीआधी दोन ते अडीच महिने जाहीर करण्याचे नियोजन पक्षाने केले आहे. गेल्या महापालिका निवडणुकीतही राष्ट्रवादी कॉंग्रेसने अशाप्रकारे वानवडीतून महापौर प्रशांत जगताप आणि नगरसेविका नंदा लोणकर यांच्या नावांची घोषणा केली होती. या भागातील अन्य पक्षाच्या उमेदवारांच्या नावांची यादी येईपर्यंत जगताप आणि लोणकर यांनी प्रचारात आघाडी घेतली होती. निवडणूक प्रचारात त्याचा फायदा झाल्याने या निवडणुकीत हेच सूत्र वापरण्यात येणार असल्याचे पक्षातील सूत्रांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, खडकवासल्यापाठोपाठ शहरातील सर्वच विधानसभा मतदारसंघांतील प्रभागरचना, आरक्षणे आणि संभाव्य उमेदवारांच्या नावांचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यानुसार उमेदवारांच्या नावांची पहिली यादी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होईल, असेही सांगण्यात आले.

Web Title: First list of NCP sustained month-end