भाजपच्या पहिल्या महापौरपदाचा मुक्ता टिळक यांना मान 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

महापालिकेतील संख्याबळ 
भारतीय जनता पक्ष - 97 
राष्ट्रवादी कॉंग्रेस - 39 
शिवसेना -10 
कॉंग्रेस - 9 
मनसे - 2 
एमआयएम - 1 
अन्य - 4 

पुणे - भारतीय जनता पक्षाच्या वतीने महापौरपदासाठी मुक्ता टिळक, तर उपमहापौरपदासाठी रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) नवनाथ कांबळे यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब झाले. या दोघांनी बुधवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपकडे असणारे स्पष्ट बहुमत लक्षात घेता महापौर-उपमहापौरपदाची औपचारिकता 15 मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीत पार पडेल. 

विरोधी पक्षाच्या वतीने आघाडी कायम राखत महापौरपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नंदा लोणकर, तर उपमहापौरपदासाठी कॉंग्रेसच्या लता राजगुरू यांनी अर्ज दाखल केला आहे. आपले स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवत शिवसेनेच्या वतीने महापौरपदासाठी संगीता ठोसर, तर उपमहापौरपदासाठी विशाल धनवडे हे रिंगणात उतरले आहेत. 

महापौर, उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी आज दुपारी तीन ते सायंकाळी पाचदरम्यान वेळ होती. महापौरपदासाठीची निवडणूक 15 मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजता होणार आहे, तर निवडणुकीपूर्वी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. 

भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी दोन्ही पदांसाठीच्या उमेदवारांची सकाळी घोषणा केली. त्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, गोगावले आणि सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांच्या उपस्थितीत त्यांनी उमेदवारी अर्ज नगरसचिव सुनील पारखी यांच्याकडे सादर केला. या वेळी पक्षाचे बहुतांश नगरसेवक उपस्थित होते. टिळक या शनिवार पेठ-सदाशिव पेठ प्रभाग क्रमांक 15 मधून, तर कांबळे हे कोरगाव पार्क-घोरपडी प्रभाग क्रमांक 21 मधून निवडून आले आहेत. टिळक या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येताना त्यांच्याबरोबर भगवे फेटे परिधान करून मोठ्या संख्येने युवती आणि महिला आल्या होत्या, तर कांबळे यांच्यासमवेत रिपब्लिकन पक्षाचे पाचही नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेसने आघाडी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दोन्ही पक्षांचे शहराध्यक्ष अनुक्रमे ऍड. वंदना चव्हाण, रमेश बागवे यांनी उमेदवारांची घोषणा केली. त्यानुसार नंदा लोणकर आणि लता राजगुरू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, या निवडणुकीत शिवसेनेनेही उडी मारली आहे. त्यानुसार पक्षाने संगीता ठोसर आणि विशाल धनवडे यांना उमेदवारी दिली. पक्षाचे गटनेते संजय भोसले यांच्या उपस्थितीत त्यांनी उमेदवारी अर्ज नगरसचिवांकडे सादर केले. मुंबई महापालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान केले. त्यामुळे पुण्यात शिवसेना भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा देईल का, याबाबत उत्सुकता होती. मात्र, भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा द्यायचा किंवा नाही, याबाबत मुंबईतून आदेश येईल, त्यानुसार निर्णय घेतला जाईल, असे पक्षाकडून सांगण्यात आले. 

महापालिकेतील संख्याबळ 
भारतीय जनता पक्ष - 97 
राष्ट्रवादी कॉंग्रेस - 39 
शिवसेना -10 
कॉंग्रेस - 9 
मनसे - 2 
एमआयएम - 1 
अन्य - 4 

Web Title: first Mayor of BJP Mukta Tilak