पहिल्याच पावसात बहुतांश पुणे अंधारात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जुलै 2016

ऐंशी टक्के कामांचा दावा फोल; तीन दिवसांपासून बहुतांश भागांतील वीजपुरवठा खंडित

ऐंशी टक्के कामांचा दावा फोल; तीन दिवसांपासून बहुतांश भागांतील वीजपुरवठा खंडित
पुणे - पहिल्याच पावसात शहरातील अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याच्या घटना घडल्या. रस्त्यांवरील फीडर पिलरवर पडलेल्या झाडांच्या फांद्या, भूमिगत वाहिन्यांमध्ये शिरलेले पाणी यांसारख्या समस्यांमुळे वीज खंडित झाली. शहरातील साठ ते सत्तर टक्के वाहिन्या भूमिगत असल्या तरी उपनगरांमध्ये मात्र अजूनही वाहिन्यांचे जाळे असून, पावसाळ्यापूर्वी केलेल्या ऐंशी टक्के दुरुस्तीच्या कामाचा महावितरणचा दावा फोल ठरला आहे. भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी आत्तापासूनच महावितरणने दक्षता बाळगणे अत्यावश्‍यक आहे.

शहरात अनेक भागांत गेल्या तीन दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. शहरात काही महिन्यांपूर्वी सिमेंट रस्ते करण्यासाठी खोदकाम केले होते. भूमिगत वाहिन्यांच्या बाजूलाच हे खोदकाम केल्याने वाहिन्यांना धक्का बसतो. उन्हाळ्यात त्यावर परिणाम होत नाही. मात्र, पावसाळ्यात या वाहिन्यांवर पाणी पडते. साहजिकच वीजपुरवठा खंडित होतो, असे महावितरणचे म्हणणे आहे. केबल टेस्टिंग व्हॅनद्वारे वाहिन्यांमधील दोष शोधण्यात येतात; पण त्यातही तासन्‌ तास वेळ जातो. भर पावसात दुरुस्तीच्या कामात अनेक अडथळे येतात. त्यामुळे वीजपुरवठा पूर्ववत होण्यास विलंब होतो, असे अधिकारी सांगतात.

वीज उपकरणांवर झाडे किंवा फांद्या तुटून पडणे, विजेच्या कडकडाटाने उपकरणांवर दाब येणे, फीडर पिलर, रिंगमेन युनिटमध्ये पाणी शिरणे यांसारख्या कारणांमुळेही वीजपुरवठा खंडित होतो. खोलगट व सखल भागामध्ये पाणी साचते, त्यामुळे काही वेळेस दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे दुर्घटना टळावी म्हणून महावितरणतर्फे रोहित्र (ट्रान्स्फॉर्मर) बंद ठेवण्यात येते.

शहराच्या अनेक भागांतील फीडर पिलर खराब झाले आहेत. काहींची झाकणे निघाली आहेत, तर काहींमधून बाहेर आलेल्या केबल्स रस्त्यावर आल्या आहेत, त्यामुळेच महावितरणने दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे. अन्यथा, भविष्यात मुसळधार पाऊस झाल्यास एखादी दुर्घटनाही होऊ शकते. शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी मध्यवर्ती सेवा केंद्र (कॉल सेंटर) सुरू करण्यात आले आहे. 1800-200-3435 किंवा 1800-233-3435 हे टोल फ्री क्रमांक आहेत. मात्र, हे कॉल्स उचलले जात नाहीत. त्यामुळे हतबल झालेल्या नागरिकांना विजेचा पुरवठा पूर्ववत होण्याची वाट पाहावी लागत आहे. दरम्यान, रविवारी रात्री उशिरा वीजपुरवठा पूर्ववत केल्याचे महावितरणने म्हटले आहे. तरीही सोमवारी बाणेर, खराडी, कात्रज अशा अनेक भागांत वीज गेल्याच्या तक्रारी नागरिक करीत होते.

"सकाळ‘कडे तक्रारी
गेल्या तीन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने सोसायट्यांच्या टाक्‍यांमध्ये मोटारीने पाणी चढविता आले नाही. त्यामुळे रोजच्या व्यवहारातील अडचणींना तोंड द्यावे लागल्याच्या तक्रारी अनेक नागरिकांनी "सकाळ‘कडे दूरध्वनी करून कळविल्या.

35 तास वीजपुरवठा खंडित
‘भारती विद्यापीठाच्या समोर नॅन्सी लेक होम येथे गेल्या 35 ते 36 तासांपासून वीज गेली आहे. वारंवार संपर्क साधूनही महावितरणकडून प्रतिसाद मिळत नाही,‘‘ असे येथील रहिवासी अभय जेरे यांनी सांगितले.

Web Title: first Rain in pune The majority Pune in the dark