पहिल्याच पावसात डबकी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जुलै 2016

पुणे - शहरात गेल्या दोन दिवसांमध्ये जेमतेम दीडशे मिलिमीटर पाऊस झाला असतानाही वर्दळीच्या रस्त्यांसह गल्लीबोळातील रस्त्यांवर तळी साचली. नव्याने केलेले सिमेंट कॉंक्रीटचे रस्ते समप्रमाणात नसल्याने त्यावरही जागोजागी पाण्याची डबकी साचली होती. रस्ता आणि ड्रेनेजच्या झाकणांची उंची सारखी नसल्याने झाकणांभोवती पाणी साचले असून, वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नसल्याचे अपघाताची भीती निर्माण झाली आहे.

पुणे - शहरात गेल्या दोन दिवसांमध्ये जेमतेम दीडशे मिलिमीटर पाऊस झाला असतानाही वर्दळीच्या रस्त्यांसह गल्लीबोळातील रस्त्यांवर तळी साचली. नव्याने केलेले सिमेंट कॉंक्रीटचे रस्ते समप्रमाणात नसल्याने त्यावरही जागोजागी पाण्याची डबकी साचली होती. रस्ता आणि ड्रेनेजच्या झाकणांची उंची सारखी नसल्याने झाकणांभोवती पाणी साचले असून, वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नसल्याचे अपघाताची भीती निर्माण झाली आहे.

वाहनांची वर्दळ असलेल्या कर्वे रस्ता, विधी महाविद्यालय आणि फर्ग्युसन रस्त्यावर खड्डे पडले असून, या भागांतील चेंबरची अनेक झाकणे तुटली आहेत. रस्त्याच्या उंचीपेक्षा त्यांची उंची कमी असल्याने ती पाण्याखाली गेली आहेत. काही रस्त्यांवरील गतिरोधक तुटले आहेत.

शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांत पावसाने हजेरी लावली. त्यात रविवारी दिवसभर झालेल्या पावसामुळे विविध भागांतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. सखल भागामुळे ते वाहून गेले नाही. पदपथाशेजारी पाणी साचल्याने पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतरही रस्त्यांवर तळी दिसत आहेत. सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांवरील लोखंडी आणि सिमेंटची झाकणेही तुटली आहेत. मात्र, नेमके अशाच ठिकाणी पाणी साचल्याने तुटलेल्या झाकणांचा वाहनचालकांना अंदाज येत नाही. गल्लीबोळातील रस्त्यांवर सखोल भागामुळे पाण्याची डबकी दिसून येत आहेत.

पावसाळी गटारांची दैना
शहरात गेल्या काही दिवसांत केलेल्या रस्त्यांच्या कडेला पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी पावसाळी गटारे बनविण्यात आलेली नाहीत. त्यामुळे या रस्त्यांवर पाण्याचा निचरा होत नसल्याचे दिसून आले. ज्या ठिकाणी पावसाळी गटारे आहेत, त्यातील गाळही काढण्यात आलेला नाही. त्यामुळे पावसाळी गटारे असून, त्यांचा फारसा उपयोग होत नाही. पावसाला सुरवात झाल्यानंतरही अनेक भागांतील गटारांमध्ये अजूनही कचरा आणि गाळ आहे. तो काढण्याचे काम महापालिकेने हाती घेतले नाही. पावसाचे पाणी वाहून कसे जाणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

स्वारगेट उड्डाण पुलावर खड्डे
स्वारगेट येथील जेधे चौकात नव्याने उभारलेल्या उड्डाण पुलावर खड्डे पडले आहेत. या उड्डाण पुलामुळे या भागातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली असली, तरी पुलावरी खड्ड्यांमुळे प्रवास धोकादायक झाला आहे. तसेच, पुलावरही काही ठिकाणी पाणी साचत असल्याचे दिसून आले आहे. पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी पुलावर सोय न केल्याने जेधे चौकातील इंग्रजी मुळाक्षरातील "वाय‘ आकाराच्या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर पडते. या पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने वाहनचालकांना धोका निर्माण झाला आहे. धनकवडीतील पुलावर पाणी साचत असल्याच्या तक्रारी आहेत.

घर, सोसायट्यांमध्ये पाणी
सिमेंट कॉंक्रीटच्या रस्त्यांचे जाळे वाढत असतानाच, शहरात पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी पुरेशी यंत्रणा नसल्याची बाब साधारणत: सहा ते सात महिन्यांपूर्वी झालेल्या पावसानंतर निदर्शनास आली. त्यामुळे जोरदार पावसामुळे रस्त्यांना ओढ्या-नाल्याचे स्वरूप येईल. शिवाय, तोकड्या आणि नादुरस्त पावसाळी गटारांमुळे घरे आणि सोसायट्यांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना वाढत असल्याचेही स्पष्ट झाले. या पार्श्‍वभूमीवर पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी संपूर्ण शहराची पाहणी करून अहवाल तयार करण्याचे काम हाती घेण्यात येईल, असे आश्‍वासन महापालिका प्रशासनाने दिले होते. आता सहा महिने झाले, तरी त्यावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही.

झाकणे धोकादायक
रस्त्यांवरील झाकणांमुळे धनकवडीत झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याने नादुरुस्त झाकणांचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. तेव्हा, अशा झाकणांची पाहणी करून कामे केली जातील, असे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले होते. त्यानुसार जवळपास दीड हजारांहून अधिक झाकणांची कामे अपेक्षित होती. अद्याप ती झालेली नाहीत. त्यामुळे बहुतेक रस्त्यांवरील झाकणे अजूनही धोकायदाक आहेत.

नव्याने केलेल्या रस्त्यांवर ज्या ज्या ठिकाणी पाणी साचले आहे. किंवा त्याची शक्‍यता आहे. अशा रस्त्यांची पाहणी करून त्यावर काय उपाययोजना करता येतील, याचे नियोजन केले जाणार आहे. याआधी ज्या रस्त्यांवर सखल भाग असल्याचे आढळून आले, तेथे तातडीने दुरुस्ती करण्यात आली आहे.
- राजेंद्र राऊत, प्रमुख, पथ विभाग, महापालिका

Web Title: First rain in pune ponds