फिटनेस ॲपचा फ्लॉपट्रेंड!

शिवानी खोरगडे
शनिवार, 19 मे 2018

पुणे - दैनंदिन तंदुरुस्तीसाठी ‘फिटनेस ॲप्स’वर अवलंबून राहून व्यायाम करत असाल, तर तो चुकीचा ठरू शकतो. त्यातून नुकसानच होऊ शकते. त्यामुळे ॲपवर अवलंबून व्यायाम करण्याऐवजी प्रशिक्षकाच्या मदतीने किंवा नेहमीचे व्यायाम प्रकार केल्यास ते उपयुक्त ठरेल, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

पुणे - दैनंदिन तंदुरुस्तीसाठी ‘फिटनेस ॲप्स’वर अवलंबून राहून व्यायाम करत असाल, तर तो चुकीचा ठरू शकतो. त्यातून नुकसानच होऊ शकते. त्यामुळे ॲपवर अवलंबून व्यायाम करण्याऐवजी प्रशिक्षकाच्या मदतीने किंवा नेहमीचे व्यायाम प्रकार केल्यास ते उपयुक्त ठरेल, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

वेगवेगळ्या वेबसाइट्‌सच्या माध्यमातून व्यायामासाठी मोठ्या संख्येने ॲप्स उपलब्ध झाली आहेत. त्यातील २ ते २० मिनिटांचे व्यायाम प्रकार पाहून त्याचे अनुकरण करण्याचा ट्रेंड सध्या आहे. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलॅंडच्या बाँड विद्यापीठातील संशोधकांनी हेल्थ आणि वेलनेसशी संबंधित मोबाईल ॲपचा अभ्यास करून ही ॲप्स उपयुक्त नसल्याचे म्हटले आहे. 

बहुतांश ॲपमधील माहिती प्राथमिक स्वरूपाची असते. त्यात प्रोग्रॅम्सनुसार व्यायाम प्रकार असतात. व्यायाम सुरू करण्याचा पहिला टप्पा पूर्ण केल्याशिवाय ॲप तुम्हाला पुढचा टप्पा सांगत नाही. तुमच्या शरीराची क्षमता किती आहे हे त्या ॲपला माहीत नसते. एखादा आजार, दुखापत किती गंभीर आहे आणि त्यानुसार व्यायामातून काय उपाय करावे हे ॲपला कळू शकत नाही. म्हणून मार्गदर्शनासाठी प्रशिक्षित प्रशिक्षकच उपयुक्त ठरतो, असे त्यांनी म्हटले आहे.

हे आहेत फिटनेस ॲप्सचे तोटे  
 ‘फिटनेस ॲप’ मार्गदर्शन करतात, प्रोत्साहन देत नाहीत 
 शरीररचनेनुसार ॲपमधून व्यायाम प्रकार सुचविला जात नाही  
 व्यायाम प्रकाराच्या अचूकतेचे ॲप मूल्यमापन करू शकत नाही
 ॲपमधून घेतलेले प्रशिक्षण किंवा डाएटपासून समस्या निर्माण झाल्यास ती नोंदवता येत नाही

डॉ. अतुल सोनवणे (एमडी, स्पोर्ट्‌स मेडिसीन) - फिटनेस ॲप लोकप्रिय होत असली, तरी त्याद्वारे चुकीचे मार्गदर्शन होण्याची शक्‍यता जास्त आहे. हे ॲप प्रत्येकाच्या शरीरानुसार कॅलरीचे प्रमाण सुचवू शकत नाही. ॲपद्वारे होणाऱ्या व्यायामावर कोणाची देखरेख नसते. त्यामुळेही काही समस्या निर्माण होऊ शकतात. ॲपसारखे शॉर्टकट वापरल्यास मान, मणक्‍याचे आजार किंवा हृदयरोगाला कमी वयात सामोरे जावे लागू शकते. 

व्यंकटेश देशमुख (पर्सनल ट्रेनर) - ॲपद्वारे व्यायाम करताना, अचूकता राहात नाही. मात्र, प्रशिक्षकाच्या माध्यमातून व्यायाम केल्यास तो बिनचूक होऊन उपयुक्त ठरतो. व्यायामात सातत्य राहते. डाएटमधील एखाद्या गोष्टीची ॲलर्जी असल्यास तुम्ही डाएटीशियनला कळवू शकता. 

सोनम करंदकर (न्यूट्रिशनिस्ट) - ॲप्स कॅलरी मोजतात. पण जिम ट्रेनर किंवा इन्स्ट्रक्‍टर तुमच्या शरीराची गरज बघून आवश्‍यक गोष्टींसाठी मार्गदर्शन करतात शिवाय मेडिकल हिस्ट्री बघून व्यायाम सुचवतात. वेळोवेळी उद्‌भविणाऱ्या समस्यांचेही ते निराकरण करू शकतात. मानसिक समुपदेशन हे फार महत्त्वाचे असून, ॲप ते देऊ शकत नाही.

स्नेहल जाधव - व्यायामात सातत्यासाठी सतत प्रोत्साहन देऊन तुमच्याकडून व्यायाम करून घेतला पाहिजे. मी फिटनेस ॲप्स वापरले आहेत; पण ते व्यायामासाठी प्रोत्साहित करत नाहीत. आज मला कंटाळा आला तर हे ॲप मला व्यायाम करायला भाग पाडत नाही. हा सगळा मानसिकतेचा खेळ आहे. म्हणून ॲप्सपेक्षा पर्सनल ट्रेनिंगला मी प्राधान्य देते.

Web Title: Fitness app floptrend