#PuneFlood पुण्यातील पाच पूल बंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

मुळशी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे मुळा नदी दुथडी भरून वाहत असून, पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांना जोडणाऱ्या पाच प्रमुख पुलांना पाणी लागल्याने सोमवारी सुरक्षिततेसाठी ते बंद करण्यात आले.

पुणे - मुळशी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे मुळा नदी दुथडी भरून वाहत असून, पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांना जोडणाऱ्या पाच प्रमुख पुलांना पाणी लागल्याने सोमवारी सुरक्षिततेसाठी ते बंद करण्यात आले. महत्त्वाचे पूल बंद झाल्यामुळे पर्यायी बोपोडी व बालेवाडी येथील पुलावर सकाळी व संध्याकाळी वाहतुकीचा ताण येऊन वाहतूक कोंडीमध्ये भर पडली.

पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांमध्ये दररोज लाखो नागरिक नोकरी, उद्योग, व्यवसायानिमित्त ये-जा करतात. त्यासाठी औंधमधील राजीव गांधी पूल, डी-मार्टजवळील महादजी शिंदे पूल, जुनी सांगवी पूल, भाऊ पाटील रस्त्याजवळील दापोडी ते बोपोडी पूल व पिंपळे निलख-बाणेरला जोडणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूल या पुलांवरून नागरिक ये-जा करतात. मात्र, रविवारी मध्यरात्रीपासून नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे मध्यरात्री जुना सांगवी पूल, सकाळी आठ वाजता महादजी शिंदे पूल, त्यानंतर भाऊ पाटील रस्त्यावरील दापोडी-बोपोडी पूल, त्यापाठोपाठ औंधमधील राजीव गांधी पूल, पिंपळे निलख येथील आंबेडकर पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.   

दरम्यान, रोजच्या प्रमाणे सोमवारी सकाळी पुणे व पिंपरीतील नागरिक नोकरी, उद्योग, व्यवसायानिमित्त जाण्यास निघाले. मात्र, औंध येथील राजीव गांधी पुलासह अन्य पूल वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे त्यांची अडचण झाली. औंध पुलाजवळील जकात नाक्‍यावरील रस्त्यावर कमरेइतके पाणी साठल्याने पोलिसांनी नागरिकांना पलीकडे जाण्यास मज्जाव केला. त्यामुळे काही वेळ पुलावर थांबून जवळील महादजी शिंदे पुलावरून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पूल खचल्याने बंद करण्यात आला, असे सहायक वाहतूक पोलिस निरीक्षक प्रकाश मोरे यांनी सांगितले.

दरम्यान, पुलाच्या दोन्ही बाजूंना अडकलेल्या वाहनांमुळे दोन्हीकडे वाहतुकीची कोंडी झाली. पीएमपी बस, आयटी कंपन्यांच्या बस, कार, रिक्षा, दुचाकी, तसेच रुग्णवाहिकेलाही पुढे जाता येत नव्हते. बहुतांश जणांनी वाहन त्याच ठिकाणी थांबवून पूल मोकळा होईल, या अपेक्षेने बराच वेळ वाट पाहिली. मात्र, वाहतूक पोलिसांसह स्थानिक कार्यकर्त्यांनी पुलाच्या दोन्ही बाजूंना थांबून नागरिकांना माघारी फिरण्याचे आवाहन केले. दुपारी एक वाजेपर्यंत हीच परिस्थिती कायम होती. काही नागरिकांनी बोपोडी व बालेवाडी येथील पर्यायी मार्गाने जाण्यास पसंती दिली.

पूल बंद केलेल्या वेळा
    जुना सांगवी पूल : रविवारी मध्यरात्रीपासून 
    महादजी शिंदे पूल (औंध) : सकाळी आठ. सायंकाळी सुरू
    राजीव गांधी पूल (औंध): सकाळी १०.३० वाजता 
    आंबेडकर पूल (पिंपळे निलख) : सकाळी १० वाजता
    बोपोडी-दापोडीला जोडणारा वि. भा. पाटील पूल :  सकाळी आठपासून   

पूल बंदचे परिणाम 
     सार्वजनिक वाहतूक  व्यवस्था ठप्प
     रुग्णांना अन्यत्र हलविताना अडचणी 
     घरपोच अन्नपदार्थ पुरविणाऱ्यांची तारांबळ 
    मजुरांच्या रोजगारावर पाणी 
    पोलिस, न्यायालय व अन्य सरकारी कामांत अडचण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five bridges closed in Pune due to rain