मागणी पाचशे कोटींची; पुरवठा अडीचशेच 

प्रसाद पाठक - सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

पुणे - रिझर्व्ह बॅंकेकडून बॅंकांना होणारा नोटांचा पुरवठा वाढत असला तरी, सध्या पुणेकरांकडून करण्यात येणारी मागणी या पुरवठ्याच्या जवळपास दुप्पट आहे. त्यामुळे पुणेकरांची गरज भागून बॅंकांतील गर्दी कमी होण्यास आणखी काही दिवस लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणेकरांची रोजच्या पैशांची गरज पाचशे कोटी असताना, पुरवठा मात्र अडीचशे ते तीनशे कोटींच्याच आसपास होत आहे. 

पुणे - रिझर्व्ह बॅंकेकडून बॅंकांना होणारा नोटांचा पुरवठा वाढत असला तरी, सध्या पुणेकरांकडून करण्यात येणारी मागणी या पुरवठ्याच्या जवळपास दुप्पट आहे. त्यामुळे पुणेकरांची गरज भागून बॅंकांतील गर्दी कमी होण्यास आणखी काही दिवस लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणेकरांची रोजच्या पैशांची गरज पाचशे कोटी असताना, पुरवठा मात्र अडीचशे ते तीनशे कोटींच्याच आसपास होत आहे. 

केंद्र सरकारने पाचशे, हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला; परंतु दैनंदिन व्यवहार लक्षात घेता पुणे शहराची दररोजची गरज शेकडो कोटी रुपयांची आहे. त्या तुलनेत रिझर्व्ह बॅंकेकडून राष्ट्रीयकृत, सहकारी आणि खासगी बॅंकांना नोटांचा नेमका किती पुरवठा होतो आहे, याची पाहणी "सकाळ'ने आज केली. त्यात सुमारे शंभराच्या आसपास शाखा असलेल्या एका बॅंकेला वीस कोटी रुपयांपर्यंतची रक्कम रोज मिळते. त्या बॅंकेतील खातेदारांची संख्या सरासरीने चार ते पाच लाख एवढी असून, त्यांच्याकडून होणारी सरासरी मागणी प्रत्येकी दहा हजार एवढी आहे. त्यामुळे बॅंकेला वीस कोटी रुपये मिळत असले तरी, मागणी 36 ते 40 कोटींपर्यंत गेली आहे. त्यामुळे बॅंकांमध्ये रोज मोठी गर्दी होते आहे. मात्र, एका खातेदाराने सरासरी प्रत्येकी दहा हजार रुपये घेतल्यानंतर त्याच्याकडून पुन्हा मागणी येण्यास काही काळ लागेल. परिणामी, काही दिवसांनी बॅंकांमधील ही गर्दी ओसरेल, असा अंदाज बॅंकेतील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केला. 

पुण्यातील 1600 शाखांमधील प्रत्येक शाखेत सरासरी 5000 ग्राहक आहेत. त्यांना दहा हजार रुपये द्यायचे म्हटले, तर पाचशे कोटी रुपये लागतील. पुरवठ्याची स्थिती पाहिली तर प्रत्येक शाखेला सरासरीने 20 लाख रुपये पुरवठा केला जातो. त्यानुसार सोळाशे शाखांना 250 ते 300 कोटी रुपये देण्यात येतात. म्हणजेच नोटांचा जवळपास निम्माच पुरवठा सध्या होतो आहे. 

खातेदारांच्या तुलनेत पन्नास टक्केही रक्कम पुरविताना बॅंकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र, खासगी बॅंकांचे बहुतांश व्यवहार हे धनादेशासहित डेबिट, क्रेडिट कार्डद्वारेच होत आहेत. त्यामुळे त्यांना फारशी अडचण जाणवत नसल्याचे तेथील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, अन्य राष्ट्रीयकृत बॅंकांकडे प्लॅस्टिक मनीद्वारे व्यवहार करणाऱ्यांचे प्रमाण तुलनेने मर्यादित आहे. त्यामुळे अशा बॅंकांना रोजच्या रोकडची आवश्‍यकता भासतेच. तरीही ग्राहकांची मागणी पुरविताना अनेक समस्या उद्‌भवत आहेत. 

काही दिवसांनी गर्दी ओसरेल 
 महिन्याची गरज भागली की सर्वसामान्य पुणेकर बॅंकेत पुन्हा येण्यास आणखी काही आठवडे लागतील. त्यामुळे येत्या काही दिवसांनी ही गर्दी ओसरेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. 

पुणे शहर - राष्ट्रीयकृत बॅंका - 27 
- सहकारी बॅंका - 57 
- खासगी बॅंका - 20 
शहरातील एकूण बॅंकांची संख्या - 1629 

पुणेकरांची रोजची पैशांची गरज (प्रत्येकी दहा हजार रुपयेप्रमाणे) -- सुमारे 500 कोटी 
रिझर्व्ह बॅंकेकडून होणारा पुरवठा -- सुमारे 250 ते 300 कोटी 
तुटवडा -- सुमारे 200 ते 250 कोटी 

पुणे शहराची लोकसंख्या - 36 ते 37 लाख अंदाजे 
खातेदारांची संख्या - लोकसंख्येच्या तुलनेत साठ ते सत्तर टक्के म्हणजे 26 ते 27 लाख 

राष्ट्रीयकृत बॅंकांची प्रातिनिधिक स्थिती -- 
- महाराष्ट्र बॅंक 
- शाखा 105 - 
-- पुरवठा -- प्रत्येक शाखेला दररोज दहा लाख रुपये, म्हणजे सर्व शाखांना मिळतात दहा कोटी पन्नास लाख रक्कम. 
- एटीएमसाठीही तेवढीच रक्कम मिळते 
- दोन्ही मिळून साधारणतः दररोज 21 कोटी रक्कम लागते. 
- प्रत्येक शाखेत सरासरी चार हजार खातेदार म्हटले तर 105 शाखांमध्ये साधारणतः साडेचार लाख खातेदार. 

स्टेट बॅंक ऑफ इंडिया 
- शाखा 86 
- खातेदार - 12,90,000 
- दररोज पंधरा लाख रुपयेप्रमाणे शाखांना मिळतात 12 कोटी 90 लाख रुपये. 
- चारशे एटीएममध्ये दोन लाख रुपये प्रमाणे दररोजचा 8 कोटी रुपयांचा भरणा. 
- सहा करन्सी चेस्टमध्ये प्रत्येकी 25 कोटी रुपयेप्रमाणे दीडशे कोटी रुपये जमा. 

बॅंक ऑफ बडोदा 
- शाखा 50 
- खातेदार - सरासरी तीन लाख 
- करन्सी चेस्ट कडून प्रत्येक शाखेला दररोज सरासरी पंधरा लाख या प्रमाणे साडेसात कोटी रुपयांचे वाटप होते. 
- ग्राहकांकडून दररोजचा भरणा 35 कोटीच्या आसपास. 

Web Title: Five crore demand