बेपर्वाईने पाच कामगारांचा मृत्यू

बेपर्वाईने पाच कामगारांचा मृत्यू

फुरसुंगी / लोणी काळभोर - हडपसर-सासवड मार्गावर उरुळी देवाची (ता. हवेली) हद्दीत राजयोग साडी डेपो या कापड दुकानाला गुरुवारी पहाटे लागलेल्या आगीत दुकानात झोपलेल्या पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. यातील चार कामगार राजस्थानचे असून, एक लातूर जिल्ह्यातील आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. 

दुकानमालकाने दुकानाला बाहेरून कुलूप लावले होते. त्यामुळे आग लागल्याचे कळूनही दुकानात झोपलेल्या पाचही कामगारांना बाहेर पडता आले नाही. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. यात सुमारे तीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. राकेश सुखदेवजी रियाड (वय २२, रा. ग्राम दासास, ता. रियाबडी, जि. नागोर, राजस्थान), धीरज ओमप्रकाश चांडक (वय २५, रा. गाधवड, लातूर), राकेश बुगारम मेघवाल (वय २०) व धर्मराज तुकाराम बडियासर (वय २५, दोघेही रा. ग्राममेवडा, ता. देगाना, जि. नागोर, राजस्थान),  सूरज परूजी शर्मा (वय २५, रा. भडायली, ता. रियाबडी, जि. नागोर, राजस्थान) अशी आगीत मृत्यू पावलेल्या कामगारांची नावे आहेत.

दुकानमालक निखिल बबन भाडळे (रा. उरुळी देवाची, ता. हवेली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लोणी काळभोर पोलिसांनी घटनेची चौकशी सुरू केली आहे.

लोणी काळभोर पोलिसांच्या माहितीनुसार, उरुळी देवाची हद्दीत भाडळे यांच्या मालकीचे सुमारे सात हजार स्क्वेअर फुटांचे गोदाम आहे. भाडळे यांनी ते सुशील नंदकिशोर बजाज (रा. शिंदेवस्ती, उरुळी देवाची) व भवरलाल हजारीमल प्रजापती (रा. सुरत, गुजरात) या दोघांना भाडेकराराने दिले होते. दुकानात साडी आणि रेडिमेड कपड्याचे दालन होते. दुकानाच्या गोदामात कामगार राहत होते. दुकानाचे व्यवस्थापक सुरेश रामाराम जाखड (रा. शिंदेवस्ती, उरुळी देवाची) हे बुधवारी (ता. ८) रात्री साडेनऊच्या सुमारास नेहमीप्रमाणे दुकानाच्या शटरला बाहेरून कुलूप लावून घरी निघून गेले. दुकानात पाचही कामगार झोपले होते. राकेश रियाड यांना गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास जाग आली तेव्हा त्यांना संपूर्ण दुकानात आग लागल्याचे आढळले. यावर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता जाखड यांना फोन करून दुकानाला आग लागल्याची माहिती दिली. तसेच, दुकानाच्या शटरला बाहेरून कुलूप असल्याने बाहेर पडता येत नसल्याचे सांगितले. जाखड यांनी ही माहिती भाडळे यांना कळवली. दरम्यान, दुकानाला लागलेली आग मोठ्या प्रमाणात भडकल्याने शेजारचे लोकही दुकानाभोवती जमा झाले. आगीने रौद्र रूप धारण केले होते. कुलूप काढल्यानंतर दुसऱ्या मजल्यावरील काचा फोडण्यात आल्या. दुकानाच्या मागच्या बाजूची भिंत तोडण्यात आली. मात्र, आतील कामगारांना वाचविण्यात यश आले नाही. 

घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी आगीची माहिती अग्निशामक दलाला दिली. त्यानंतर पंधरा मिनिटांत अग्निशामक दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी पाण्याचा मारा करून तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्‍यात आणली. मात्र, आगीत पाचही कामगारांना आपला जीव गमवावा लागला. अपर पोलिस अधीक्षक जयंत मीना, पोलिस उपअधीक्षक डॉ. सई भोरे पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.

धूर कोंडून श्वास गुदमरला
आत अडकलेल्या पाचही कामगारांनी स्वतःला वाचविण्यासाठी बाहेर पडण्याच्या उद्देशाने हाती लागतील त्या वस्तूने दुकानाच्या खिडक्‍या वाकविण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना बाहेर पडता आले नाही. दुकानातील कपड्यांनी पेट घेतल्याने पाचही जणांचा होरपळून मृत्यू झाला. आगीच्या वेळचा धूर कोंडून राहून कामगारांचाही श्वास गुदमरला. तळमजला व पहिला मजला अशा दोन्ही मजल्यावरील सर्व साड्या व रेडिमेड कपडे जळून खाक झाले. आग एवढी भीषण होती की आतील सर्व फर्निचर, लोखंडी कपाटे, सिलिंग फॅनही जळाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com