बिबवेवाडीत साकारणार पाचशे खाटांचे रुग्णालय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

पुणे - शहराच्या दक्षिण भागातील नागरिकांना आता कमी दरात आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. बिबवेवाडी येथील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाच्या ( ईएसआयसी ) जागेवर पाचशे खाटांचे रुग्णालय उभे राहणार आहे. याचे भूमिपूजन नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. 

पुणे - शहराच्या दक्षिण भागातील नागरिकांना आता कमी दरात आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. बिबवेवाडी येथील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाच्या ( ईएसआयसी ) जागेवर पाचशे खाटांचे रुग्णालय उभे राहणार आहे. याचे भूमिपूजन नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. 

रुग्णालयासंदर्भात झालेल्या बैठकीला केंद्रीय कामगारमंत्री संतोषकुमार गंगवार यांच्यासोबत खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, ईएसआयसीचे डी. जी. राजकुमार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. आर. के. कटारिया आदी उपस्थित होते. या बैठकीत सदर रुग्णालय उभे करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिसाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. यासंदर्भात केलेल्या पाठपुराव्याची माहितीही त्यांनी दिली. ईएसआयसी रुग्णालयाकरिता सुरवातीला ५३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्या वेळी रुग्णालय न बांधता इमारतीचे नूतनीकरण करावे, असा प्रस्ताव बदलून काम सुरू झाले. त्यास आक्षेप घेण्यात आला होता. खासदार शिरोळे यांच्या समवेत गंगवार यांची दोन वेळा भेट घेऊन वस्तुस्थिती सांगण्यात आली. गंगवार यांच्या आदेशानुसार जून महिन्यात ईएसआयसीच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागा आणि प्रकल्पाची पाहणी केली. या अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार गंगवार यांनी पाचशे खाटांचे रुग्णालय उभे करण्यास हिरवा कंदील दाखविला, असे मिसाळ यांनी सांगितले. 

सध्या सुरू असलेले नूतनीकरण सुरूच राहील. पहिल्या टप्प्यात २०० खाटांची क्षमता असलेली इमारत उभारली जाईल आणि दुसऱ्या टप्प्यात उर्वरित बांधकाम केले जाईल. या रुग्णालयाचे व्यवस्थापन ईएसआयसीकडेच राहणार आहे. बांधकामाचा खर्च ईएसआयसीच करणार आहे. महापालिका, राज्य सरकार यांच्याकडून निधीची आवश्‍यकता नाही. 

दक्षिण पुण्यात साडेसोळा एकरवर ससूनच्या धर्तीवरील रुग्णालय
शंभर खाटा कामगारांसाठी राखीव
अत्याधुनिक आरोग्य सुविधा, यंत्रणा उपलब्ध होणार

Web Title: Five hundred bed hospital to be constructed in Bibvewadi