एल्गार परिषदेच्या आयोजकासह पाच जणांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

पुणे - पुण्यात एल्गार परिषदेचे आयोजन करून कोरेगाव भीमामधील दंगलीस चिथावणी दिल्याचा आरोप ठेवत रिपब्लिकन पॅंथर्सचे सुधीर ढवळे यांच्यासह पाच जणांना बुधवारी अटक करण्यात आली. पुणे पोलिसांच्या पथकाने मुंबईतील गोवंडी भागातून ढवळे यांना बुधवारी पहाटे ताब्यात घेतले. त्यापाठोपाठ नागपूर येथून ऍड. सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन आणि महेश राऊत यांना, तर दिल्लीतून रोनी विल्सन यांना अटक करण्यात आली. 

पुणे - पुण्यात एल्गार परिषदेचे आयोजन करून कोरेगाव भीमामधील दंगलीस चिथावणी दिल्याचा आरोप ठेवत रिपब्लिकन पॅंथर्सचे सुधीर ढवळे यांच्यासह पाच जणांना बुधवारी अटक करण्यात आली. पुणे पोलिसांच्या पथकाने मुंबईतील गोवंडी भागातून ढवळे यांना बुधवारी पहाटे ताब्यात घेतले. त्यापाठोपाठ नागपूर येथून ऍड. सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन आणि महेश राऊत यांना, तर दिल्लीतून रोनी विल्सन यांना अटक करण्यात आली. 

पुण्यात शनिवारवाड्याच्या प्रांगणात 31 डिसेंबर 2017 रोजी एल्गार परिषदेचे आयोजन केले होते. त्यात चिथावणीखोर भाषणे दिल्याप्रकरणी गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी, दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिद आणि परिषदेच्या आयोजकांवर पुण्यातील विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या परिषदेच्या आयोजनात सुधीर ढवळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. 

एल्गार परिषदेतील चिथावणीखोर भाषणे, तसेच सादर केलेल्या गीतांमुळे हिंसाचाराला खतपाणी मिळाल्याबद्दल फिर्याद दाखल झाली होती. त्यानंतर ढवळे, ऍड. गडलिंग, राऊत, विल्सन आणि सेन यांच्या घरांवर दोन महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांच्या पथकाने छापे टाकले होते. तेथून काही पुस्तके, तसेच भित्तिपत्रके जप्त करण्यात आली होती. तसेच पुण्यातील कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांचीदेखील चौकशी करण्यात आली होती. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या पाच जणांना गुरुवारी (ता. 7) पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

ढवळेचे विद्रोही चळवळीशी नाते 
सुधीर ढवळे हे रिपब्लिकन पॅंथर्सच्या माध्यमातून विद्रोही चळवळीशी जोडले गेलेले होते. नागपूर येथील ऍड. सुरेंद्र गडलिंग हे नक्षलवादी चळवळीतील आरोपींचे खटले चालवितात. महेश राऊत मूळचे गडचिरोलीतील असून, सध्या नागपुरात स्थायिक झाले आहेत. मुंबईतील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून त्यांनी उच्चशिक्षण घेतलेले आहे. तर, शोमा सेन नागपूर विद्यापीठातील इंग्रजीच्या निवृत्त प्राध्यापिका आहेत. रोनी विल्सन मूळचे केरळचे असून, जंगली व शहरी नक्षलवाद्यांचा दुवा म्हणून ते काम करतात. नक्षलवादी चळवळीचा नेता प्रा. साईबाबा यांचे निकटवर्तीय म्हणूनही ते ओळखले जातात. 

पोलिसांकडून ज्या पाच जणांना अटक केली आहे, ते शहरी भागात नक्षलवादी संघटनांसाठी काम करणारे महत्त्वाचे कार्यकर्ते आहेत. माओवादी संघटनांशी त्यांचे संबंध असल्याचे त्यांच्याकडील कागदपत्रांवरून निदर्शनास आले आहे. एल्गार परिषदेत झालेल्या भाषणांची काटेकोर तपासणी केली जात आहे. तसेच, कबीर कला मंचच्या कलाकारांनी सादर केलेल्या गाण्यांमुळे हिंसाचाराला खतपाणी मिळून वातावरण चिघळले. आम्ही कोणत्याही दलित संघटनांविरोधात कारवाई केलेली नाही. 
- रवींद्र कदम, पोलिस सह-आयुक्त, पुणे 

Web Title: Five people arrested with the organizers of Elgar Council