पाच जण भागवतात गावाची तहान...

राजकुमार थोरात
गुरुवार, 24 मे 2018

निमसाखर (इंदापूर) - येथील गावामध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र पाणी टंचाई आहे. गावामध्ये पाच दिवसातुन एकदा पिण्याचे पाणी येत आहे. मात्र गावातील पाच नागरिक गावकऱ्यांना पिण्याचे पाणी देवून तहान भागविण्याचा प्रयत्न करीत आहे.

निमसाखर (इंदापूर) - येथील गावामध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र पाणी टंचाई आहे. गावामध्ये पाच दिवसातुन एकदा पिण्याचे पाणी येत आहे. मात्र गावातील पाच नागरिक गावकऱ्यांना पिण्याचे पाणी देवून तहान भागविण्याचा प्रयत्न करीत आहे.

इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये नीरा नदी काठी निमसाखर गाव वसलेले आहे. गावाजवळून नदी वाहत आहे. मात्र उन्हाळ्यामध्ये गावामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई होत असते. सध्या गावामध्ये पाच दिवसातुन एकदा पिण्याचे पाणी येत असल्याने गावामध्ये पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. मात्र गावातील गावातील भगवान विष्णू रणसिंग, सुनिल हनुमंत मोरे, नंदकुमार लक्ष्मण रणवरे, अमोल अरुण रणवरे ,हनुमंत काशिनाथ होमकर हे गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी देवून गावाची तहान भागविण्याचा प्रयत्न करीत आहे. या पाचही जणांनी स्वत:च्या मालकीची खासगी बोअरवेल गावासाठी खुली केली आहेत. प्रत्येकाने घरासमोर पाण्याच्या टाक्या ठेवल्या असून, टाकीमध्ये बोअरवेलचीचे पाणी सोडले जाते. यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची चोवीस तास सोय केली आहे. 

यातील भगवान रणसिंग हे गेल्या चौदा-पंधरा वर्षापासुन नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देत आहेत. निमसाखर, बांगार्डे, मानेवस्ती, बोंद्रेवस्ती परीसरातील नागरिक पिण्याचे पाणी घेवून जात आहेत. तर सुनिल मोरे ही गेल्या अनेक वर्षापासुन नागरिकांच्या पिण्याचा पाण्याची सोय करीत आहेत. ग्रामपंचायतीला पाणी पुरवठा योजनेसाठी नुकतेच साडेपाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पुढील वीस वर्षाचे नियोजन करुन गावामध्ये चांगली पाणीपुरवठा योजना राबविण्याचा निर्धार ग्रामपंचायतीने केला आहे. मात्र तोपर्यंत तरी पाच जण गावची तहान भागविणार आहेत.

Web Title: Five people provide drinking water to the village ...