संशयास्पद रकमेबद्दल पाच हजार जणांना नोटिसा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 डिसेंबर 2016

पुणे - मुंबई वगळता राज्यामध्ये बाराशे व्यक्तींच्या "जन-धन' बॅंक खात्यांमध्ये पन्नास हजारांहून अधिक रकमेची आणि तीन हजार वैयक्तिक बॅंक खात्यांमध्ये एक कोटीहून अधिक रकमेचा संशयास्पद भरणा झाल्याचे प्राप्तिकर खात्याच्या निदर्शनास आले आहे. संशयास्पद वाटतील अशा जादा रकमेचा भरणा बॅंक खात्यांमध्ये करणाऱ्या एकूण पाच हजार जणांना आतापर्यंत नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती प्राप्तिकर खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

पुणे - मुंबई वगळता राज्यामध्ये बाराशे व्यक्तींच्या "जन-धन' बॅंक खात्यांमध्ये पन्नास हजारांहून अधिक रकमेची आणि तीन हजार वैयक्तिक बॅंक खात्यांमध्ये एक कोटीहून अधिक रकमेचा संशयास्पद भरणा झाल्याचे प्राप्तिकर खात्याच्या निदर्शनास आले आहे. संशयास्पद वाटतील अशा जादा रकमेचा भरणा बॅंक खात्यांमध्ये करणाऱ्या एकूण पाच हजार जणांना आतापर्यंत नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती प्राप्तिकर खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता चलनातील जुन्या पाचशे व हजारच्या नोटा रद्द केल्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर आतापर्यंत म्हणजे 42 दिवसांतील कारवाईची माहिती प्राप्तिकर खात्याकडून देण्यात आली. प्राप्तिकर खात्याच्या पुणे इन्व्हेस्टिगेशन विभागांतर्गत मुंबई वगळता राज्याचा भाग येतो. या विभागाने आतापर्यंत 57 "सर्च अँड सर्व्हे' प्रकारच्या कारवाया केल्या असून, त्यामध्ये 30 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. या कारवाईत दोन सहकारी बॅंकांचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या 30 कोटीपैकी 12.32 कोटी रुपये नव्या नोटांमधील होते. तसेच पोलिसांनी केलेल्या प्राथमिक कारवाईनंतर प्राप्तिकर विभागाने जप्त केलेली रक्कम 6.32 कोटी असून त्यामध्ये फक्त 24 लाख रुपये नव्या नोटांमधील होते, असेही प्राप्तिकर अधिकाऱ्याने सांगितले.

बेहिशेबी 100 कोटी "उघडकीस'
गेल्या 42 दिवसांच्या कालावधीत शंभर कोटी रुपयांच्या बेहिशेबी रकमेचा "शोध' प्राप्तिकर खात्याने लावला आहे. त्यापैकी चार गंभीर प्रकरणांचा पुढील तपास करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि सक्तवसुली संचलनालयाकडे (ईडी) पाठविण्यात आला आहे. यामध्ये पुण्यातील महाराष्ट्र बॅंकेच्या लॉकरमध्ये सापडलेल्या अकरा कोटी रुपयांच्या प्रकरणाचाही समावेश आहे. तसेच, पाच-सहा सराफ व्यापारी यांच्यासह बिल्डर व अन्य क्षेत्रांतील व्यावसायिकांना आतापर्यंत कारवाईस सामोरे जावे लागले आहे.

पुणे पुन्हा "टॉप 3'मध्ये
""काही महिन्यांपूर्वी आलेल्या "आयडीएस' या योजनेनुसार स्वतःहून बेहिशेबी रोकड व मालमत्ता जाहीर करणाऱ्या व्यक्तींच्या व रकमेच्या प्रकरणांमध्ये प्राप्तिकर खात्याचा पुणे विभाग "टॉप'मध्ये आला होता. आता चलनबदलाच्या निर्णयानंतर केलेल्या कारवाईच्या आणि जप्त केलेल्या नोटा तसेच जाहीर करण्यात आलेल्या बेहिशेबी रकमेच्या प्रकरणांमध्येही पुणे विभाग "टॉप 3'मध्येच आहे,'' अशी माहिती प्राप्तिकर खात्याच्या पुणे विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

नागरिकांना आवाहन
""बेहिशेबी पैशाबद्दल तसेच कोणी जुन्या किंवा नव्या नोटांची रोकड लपवून ठेवली असल्यास त्याबाबतची माहिती प्राप्तिकर खात्याला 18002335212 या टोल फ्री क्रमांकावर, 7066768062 या मोबाईल क्रमांकावर अथवा itblackmoney2016@gmail.com किंवा blackmoneyinfo@incometax.gov.in या इमेल आयडीवर पाठवावी,'' असे आवाहन प्राप्तिकर खात्याच्या पुणे विभागाचे अतिरिक्त संचालक के. के. ओझा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.
प्राप्तिकर खात्याला माहिती पाठवताना ती अचूक द्यावी जेणेकरून त्याची चौकशी तातडीने करता येईल. तसेच प्रत्येक तक्रारीवरील केलेली कारवाई नागरिकांना देण्यास आम्ही बांधील नाही. त्यामुळे नागरिकांनी माहिती दिल्यानंतर त्या प्रकरणाचा पाठपुरावा करू नये. वरिष्ठ अधिकारी या तक्रारींची दाखल घेऊन योग्य कारवाई करतील, याची खात्री नागरिकांनी बाळगावी, असेही प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Five thousand peoples got notice for suspected money