शिक्षण क्षेत्रात पवित्र पर्व

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

शिक्षण क्षेत्रात अखेर ‘पवित्र’ पर्वाची सुरवात झाली आहे. राज्याच्या शिक्षण खात्याने आज राज्यातील पाच हजार ८२२ जणांची शिक्षक म्हणून ‘पवित्र पोर्टल’द्वारे गुणवत्तेच्या आधारे थेट निवड केली आहे.

पुणे/मुंबई - शिक्षण क्षेत्रात अखेर ‘पवित्र’ पर्वाची सुरवात झाली आहे. राज्याच्या शिक्षण खात्याने आज राज्यातील पाच हजार ८२२ जणांची शिक्षक म्हणून ‘पवित्र पोर्टल’द्वारे गुणवत्तेच्या आधारे थेट निवड केली आहे. या सर्वांना कोणत्याही मुलाखतीविना स्थानिक स्वराज्य संस्था आणि ‘रयत’सह चौदा खासगी अनुदानित शिक्षण संस्थांच्या शाळांमध्ये नोकरी मिळणार आहे.

राज्यातील शिक्षकांच्या तब्बल नऊ वर्षांपासून रखडलेल्या शिक्षकभरतीला आता मुहूर्त मिळाला. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकभरतीची घोषणा होऊन दोन वर्षे उलटूनही ही प्रक्रिया तांत्रिक अडचणींमुळे रखडली होती. आती ती सुरू झाली आहे. पवित्र पोर्टलवरून १२ हजार १४० शिक्षकांच्या भरती प्रक्रियेला सुरवात झाली. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा) यातील नऊ हजार १२८ पदे कोणत्याही मुलाखतीशिवाय भरण्यात येतील. त्यापैकी पाच हजार ८२२ पदांसाठी निवड यादी शुक्रवारी (ता. ९) सायंकाळी जाहीर करण्यात आली असून, तीन हजार २५८ पदे रिक्‍त राहिली आहेत. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका आणि काही खासगी शाळांमधील शिक्षकांच्या भरतीसाठी ही निवड यादी तयार करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीतील गुणवत्ता निवड यादीसाठी ग्राह्य धरण्यात आली आहे. उमेदवारांचे विषय, आरक्षण आणि गुणवत्तानुसार निवड झालेल्यांना १३ ते २१ ऑगस्टदरम्यान शिफारस केलेल्या संस्थेत कागदपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहावे लागेल.

पात्र उमेदवारच नाहीत
सहावी ते आठवी या गटात इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांसाठी अर्हताप्राप्त उमेदवार मिळाले नाहीत. त्यामुळे दोन हजार ३९२ पदे रिक्‍त राहिली आहेत. मराठी माध्यमाच्या शाळांमधील दोन हजार ३११, उर्दू ६९७, इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील २३७ पदांवर पात्र उमेदवार मिळाले नाहीत. हिंदी शाळांतील २७, कन्नड १२ आणि महापालिकेच्या हिंदी शाळांतील १३ पदे रिक्‍त राहिली आहेत. अनुसूचित जातीतील ३६९, इतर मागासवर्गीय ३०१, एसईबीसी २३२, ईडब्ल्यूएस १६१, खुल्या गटातील ११६, भटक्‍या जमाती ब, क, व ड प्रवर्गांतील २२७, विमुक्‍त जातीतील ८१ आणि विशेष मागास प्रवर्गातील ६५ पदांवर पात्र उमेदवार मिळाले नाहीत.

न्यायालयाची परवानगी घेणार
‘‘पवित्र प्रणालीबाबत उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका प्रलंबित आहेत. त्यामुळे शिक्षण खात्याने शिक्षकांची निवड यादी जाहीर केली असली, तरी निवड झालेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणीची प्रक्रिया पूर्ण होईल. पण, या शिक्षकांना नियुक्ती देण्यासाठी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्याची प्रक्रिया तातडीने सुरू केली जाईल. ही परवानगी मिळाल्यावर संबंधित नियुक्ती प्राधिकारी या शिक्षकांना नियुक्तिपत्र देतील,’’ असे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी सांगितले.

शिक्षण क्षेत्रात पवित्र पर्वाची सुरवात झाली आहे. गुणवत्ता असलेला शिक्षक शिक्षण क्षेत्रात आला पाहिजे, या अपेक्षांची पूर्ती आज होत आहे. गुणवान शिक्षकांना कोणत्याही अडथळ्याविना थेट नोकरी मिळणार असल्याचे समाधान आहे.
- आशिष शेलार, शालेय शिक्षणमंत्री

निवड झालेले शिक्षक
३५३० - जिल्हा परिषद
१०५३ - महापालिका
१७२ - नगरपालिका
०६७ - खासगी शाळा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: five thousand teachers have been directly selected