फ्लेक्‍स कारवाईवरून घूमजाव

फ्लेक्‍स कारवाईवरून घूमजाव

खडकवासला - अनधिकृत फ्लेक्‍स लावून शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या मंडळांवर कारवाईची मागणी करणाऱ्या महापालिकेने घूमजाव केला आहे. संबंधितांवर कारवाई करू नये, समज देऊन सोडावे, अशी पत्रे पोलिस ठाण्यांना दिल्याने पोलिस बुचकळ्यात पडले आहेत.

दहीहंडीच्या आदल्या रात्री सिंहगड रस्त्यावर फ्लेक्‍स लावण्याच्या वादातून अजय घडशी याचा खून झाला होता. त्यानंतर महापालिकेने सिंहगड रस्ता परिसरातील अनधिकृत फ्लेक्‍सवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेचे सहाय्यक आयुक्त संतोष तांदळे यांनी ३ सप्टेंबरला तसे पत्र सिंहगड रस्ता व दत्तवाडी पोलिसांना दिले. उच्च न्यायालयाच्या अनधिकृत फ्लेक्‍सवरील आदेशाची अंमलबजावणी करून कारवाई करण्याचे पत्रात म्हटले होते; मात्र दोन दिवसांनतर म्हणजे ५ सप्टेंबरला महापालिकेने पुन्हा पोलिसांना एक पत्र दिले. यामध्ये फ्लेक्‍स लावणाऱ्या मंडळांनी महापालिकेला सर्व फ्लेक्‍स करण्यासाठी सहकार्य केले आहे. सर्व फ्लेक्‍स काढले असल्याने त्या मंडळांवर गुन्हे दाखल करणे संयुक्तिक होणार नाही. सामाजिक व धार्मिक कार्यक्रम असल्याने संबंधित मंडळांना फ्लेस लावण्याबाबत समज देण्यात यावी, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. यामुळे आता पोलिस अडचणीत आलेले आहेत. 

२३ जणांवर गुन्हे दाखल
महापालिकेने दिलेल्या पहिल्या पत्रानुसार सिंहगड रस्ता पोलिसांनी ४ मार्चला २१, तर दत्तवाडी पोलिसांनी २ दोघा जणांवर गुन्हे दाखल केले. त्यानंतर महापालिकेने दिलेल्या दुसऱ्या पत्रात गुन्हे दाखल करू नये, असे म्हटल्याने पोलिस चांगलेच अडचणीत आले आहे.

अनधिकृ फ्लेक्‍सवर कारवाई करण्याचे पत्र ३ सप्टेंबरला सिंहगड रस्ता व दत्तवाडी पोलिसांना दिले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी केली होती.
- संतोष तांदळे, सहायक आयुक्त, महापालिका   

महापालिकेने दिलेल्या पत्रानुसार आम्ही गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे आम्हाला यावर चार्जशीट पाठवावे लागणार आहे. पालिकेने न्यायालयात आम्हाला सहकार्य करावे. महापालिकेच्या दुसऱ्या पत्राबाबत आम्ही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत. 
- सरदार पाटील, पोलिस निरीक्षक, सिंहगड रस्ता पोलिस ठाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com