पुणे विद्यापीठ दहा गावे उभी करणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

पुरामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील अनेक गावांतील जनजीवन उद्‌ध्वस्त झाल्याने राज्यभरातून त्यांच्यासाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठही आपला वाटा उचलणार आहे. या दोन जिल्ह्यांतील प्रत्येकी पाच अशा दहा गावांची उभारणी करण्यासाठी विद्यापीठ मदत करणार आहे. प्रत्येक गावात राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) दोनशे म्हणजे एकूण दोन हजार विद्यार्थी योगदान देणार आहेत.

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात ‘एनएसएस’चे दोन हजार विद्यार्थी योगदान देणार
पुणे - पुरामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील अनेक गावांतील जनजीवन उद्‌ध्वस्त झाल्याने राज्यभरातून त्यांच्यासाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठही आपला वाटा उचलणार आहे. या दोन जिल्ह्यांतील प्रत्येकी पाच अशा दहा गावांची उभारणी करण्यासाठी विद्यापीठ मदत करणार आहे. प्रत्येक गावात राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) दोनशे म्हणजे एकूण दोन हजार विद्यार्थी योगदान देणार आहेत.  

दोन्ही जिल्ह्यातील रहिवाशांना नव्याने उभारी घेण्यासाठी मदतीची गरज आहे. हे ओळखून पुणे विद्यापीठाने दहा गावे दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी यंत्रणेचे मार्गदर्शन घेऊनच विद्यापीठ गावे दत्तक घेणार असून, या गावांची पुन्हा उभारणी करणार आहे.

याबाबत विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे म्हणाले, ‘‘विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दहा गावे दत्तक घेण्यास मंजुरी दिली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच शिक्षण संस्थाचालक, प्राध्यापक, प्राचार्य संघटना, कर्मचारी संघटनांशी चर्चा सुरू आहे. या प्रत्येकाने मदतीसाठी किमान शंभर रुपये योगदान द्यायचे आहे. 

स्वच्छता मोहीम राबविणार
राजेश पांडे म्हणाले, ‘‘पुरामुळे गावांमध्ये रोगराई पसरण्याची भीती आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळ व ‘एनएसएस’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मदतीने गावांमध्ये स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. प्रत्येक गावामध्ये दोनशे मुलांचे शिबिर होईल. हे विद्यार्थी प्रत्येक घरामध्ये प्रत्यक्ष जाऊन त्यांचा घरसंसार उभा करण्यास मदत करतील.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood Affected 10 Village Help by Pune University