पूरग्रस्तांसाठी उभारणार लोकसहभागातून १०० घरे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याचा एक भाग म्हणून या दोन्ही जिल्ह्यांत गरजूंसाठी किमान १०० घरे लोकसहभागातून बांधून देण्यासाठी या जिल्ह्यांशी नाळ असणाऱ्या; पण सध्या विविध ठिकाणी विखुरलेल्या व्यक्ती आणि संस्थांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठीच्या नियोजनाची बैठक येत्या शनिवारी (ता. २४) सकाळी अकरा वाजता मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालयात होणार आहे.

पुणे - सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याचा एक भाग म्हणून या दोन्ही जिल्ह्यांत गरजूंसाठी किमान १०० घरे लोकसहभागातून बांधून देण्यासाठी या जिल्ह्यांशी नाळ असणाऱ्या; पण सध्या विविध ठिकाणी विखुरलेल्या व्यक्ती आणि संस्थांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठीच्या नियोजनाची बैठक येत्या शनिवारी (ता. २४) सकाळी अकरा वाजता मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालयात होणार आहे.

महापुरामुळे सांगली आणि कोल्हापूरच्या अनेक तालुक्‍यांत नागरिकांची अपरिमित हानी झाली आहे. शासकीय मदत पोचत असली, तरी तिला मर्यादा आहेत. हे लक्षात घेऊन अनाथ आणि वंचित मुलांसाठी ‘बालोद्यान’ संस्था चालविणारे कुलभूषण बिरनाळे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

लोहसहभागातून घरे उभारण्याची कल्पना त्यांनी ‘सोशल मीडिया’वरून मांडली अन्‌ तिला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रसिद्ध वास्तुसंरचनाकार शिरीष बेरी आणि टाटा ग्रुपचे माजी व्यवस्थापक दीपक गोखले प्रकल्पाचा आराखडा तयार करीत आहेत. इन्फोसिस, महाराष्ट्र चेंबर, रुरल रिलेशन्स, स्ट्रॅटेजिक फोरसाइट आदी अनेक संस्था तसेच व्यक्तींनी या प्रकल्पात सहभागी होणार असल्याचे कळविले आहे. ‘आयएएस’ अधिकाऱ्यांच्या संघटनेनेही सहभाग नोंदविणार असल्याचे कळविले आहे. याबाबत नियोजनासाठी शनिवारी बैठक होणार आहे.

या प्रकल्पाला मार्गदर्शन करणे किंवा काही सूचना नोंदविण्यासाठी इच्छुक असलेल्या नागरिकांनीही बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन बिरनाळे यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood Affected 100 Home Making by People share Humanity