नुकसान भरपाईसाठी पूरग्रस्तांचे धरणे (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

दीड महिन्यानंतरही पंचनामे नाहीत
आंबिल ओढ्याला पूर येऊन दीड महिना लोटला आहे. या पुरात अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त झाले आहेत. मात्र अद्यापही काही घरांचे नुकसानीचे पंचनामे करण्यात आलेले नाहीत. जाहीर केलेल्या नुकसान भरपाईची रक्कम तोकडी आहे. तीही अद्याप पूर्णपणे मिळालेली नाही. यापैकी अनेकांना केवळ पाच हजार रुपयेच मिळाले असल्याचे आंदोलकांनी सांगितले.

पुणे - आंबिल ओढ्याला सप्टेंबरमध्ये आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना नुकसान भरपाई द्यावी, त्यांच्या कुटुंबांना तीन महिने पुरेल इतका किराणा द्यावा, नुकसान झालेल्या उर्वरित घरांचे पंचनामे करावेत, आदींसह विविध मागण्यांसाठी पूरग्रस्तांनी शनिवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

नौजवान भारत सभा आणि आंबिल ओढा पूरग्रस्त नागरिक संघर्ष समितीच्या वतीने डॉ. निखिल एकडे आणि रवी पुर्णे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यात दांडेकर पूल, आंबेडकर वसाहत, टांगेवाला कॉलनी, राजेंद्रनगर, अण्णा भाऊ साठे वसाहत आदी भागांतील सुमारे २०० पूरग्रस्त सहभागी झाले होते. उपायुक्त (महसूल) शाखेच्या उपजिल्हाधिकारी स्नेहल बर्गे यांना आंदोलकांनी मागण्यांचे निवेदन दिले. नुकसान भरपाईबरोबरच वर्षभराचे घरभाडे द्यावे, शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क आणि तीन महिन्यांचे वीजबिल माफ करावे, गेल्या तीन महिन्यांत आजारी पडलेल्या नागरिकांना वैद्यकीय खर्च देण्यात यावा आदी मागण्या या निवेदनात केल्या आहेत. मागण्यांच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन बर्गे यांनी दिले. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाने आर्थिक मदतीबाबत प्रस्ताव पाठवला नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर हा प्रस्ताव तत्काळ पाठविला.

संभाजी ब्रिगेडचे आंदोलन
पुणे - राज्यात पावसाने थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके मातीमोल झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित भरपाई मिळावी, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शनिवारी आंदोलन करण्यात आले.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ५० हजार नुकसानभरपाई द्यावी, संपूर्ण पीककर्ज माफ करावे, वीजबिल माफ करावे, रब्बीची बियाणे आणि खते मोफत द्यावीत आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या. संघटनेचे मुख्य समन्वयक शांताराम कुंजीर, नाना निवंगुणे, हनुमंत मोटे, प्राची दुधाणे, अनिल ताडगे या वेळी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: flood affected agitation for compensation