बाधीत कुटुंबांना 5 हजार रुपयांची मदत रोख देणार : डॉ. म्हैसेकर

Flood-affected
Flood-affected

पुणे : पुणे विभागातील पावसाचा जोर कमी झाल्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीतील पूरपातळी ताशी एक इंचाहून अधिक या वेगाने ओसरत आहे. पावसाची स्थिती सामान्य राहिल्यास उद्यापर्यंत 70 ते 75 टक्के गावांचा संपर्क पूर्ववत सुरू होईल. सध्या संपूर्ण विभागातील 4 लाख 41 हजार 845 व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवून त्यांची 524 निवारा शिबिरात व्यवस्था करण्यात आली आहे. यापुढे आरोग्यसेवा, स्वच्छतेसह मदत कार्याला प्राधान्य देण्यात येणार असून बाधीत कुटुंबांना 5 हजार रुपयांची रोख मदत दिली जाणार आहे. उर्वरीत रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज (रविवार) दिली. तसेच बाधितांना युआडीच्या आधारे मदत देण्यात यावी त्यांना अन्य कोणत्याही पुराव्याची मागणी करू नये, अशा सूचना बँकांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे विभागातील पूरस्थिती, बचाव व मदत कार्याबाबत माहिती देण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. म्हैसेकर बोलत होते.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागात पावसाचा जोर ओसरला असून अलमट्टी धरणातून 5 लाख 30 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे, मात्र धरणात 6 लाख 45 हजार क्युसेक एवढी पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे पूर पातळी कमी होण्यास वेळ लागत आहे. सांगली आणि कोल्हापूरच्या नद्या अजूनही धोका पातळीच्यावर सरासरी सात ते आठ फूट वाहत आहेत. विभागातील 163 रस्ते बंद असून 79 पूल पाण्याखाली आहेत. कोल्हापूरशी अजूनही रस्ते वाहतूक सुरु झालेली नाही, पुणे-बंगळूरु महामार्गावरील वाहतूक अजूनही बंद आहे, आज संध्याकाळपासून रस्त्यांची चाचणी करून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक कोल्हापूरला करण्यात येणार आहे. मात्र सध्या सामान्य वाहनांसाठी बंदच राहणार आहे. पावसाची स्थिती सामान्य राहिल्यास उद्यापर्यंत 70 ते 75 टक्के गावांचा संपर्क पूर्ववत होण्यास मदत होणार आहे.
4 लाख 41 हजार 845 व्यक्तींचे स्थलांतर

पुणे विभागातील एकूण 4 लाख 41 हजार 845 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करून त्यांची 524 निवारा केंद्रात सोय केलेली आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील 1 लाख 58 हजार 97, कोल्हापूर जिल्ह्यातील 2 लाख 45 हजार 229, सातारा जिल्ह्यातील 10 हजार 486, सोलापूर जिल्ह्यातील 26 हजार 991 तर पुणे जिल्ह्यातील 161 लोकांचा समावेश आहे. पुरामुळे विभागात एकूण 40 व्यक्तींचा मृत्यू झाला असून त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील 19 लोक, कोल्हापूर जिल्ह्यातील 6 लोक, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील प्रत्येकी 7 लोक तर सोलापूर जिल्ह्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. सांगली जिल्ह्यातील ब्रम्हनाळ येथील बोट दुर्घटनेतील बेपत्ता असणाऱ्या 5 व्यक्तींचे मृतदेह आज सापडले असून एक व्यक्ती जिवंत आहे. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या 17 एवढी आहे, या दुर्घटनेतील आणखी कोणीही बेपत्ता नाही.
मदत कार्याला प्राधान्य

सध्या पूराच्या पाण्याची पातळी कमी होत असल्याने कोठेही बचावाची मागणी नव्याने होत नाही. त्यामुळे मदत कार्याला प्राधान्य देण्यात येत आहे. शासनाच्यावतीने 10 हजार ब्लँकेट, साडे बारा हजार चटई एनडीआरएफच्या टीमव्दारे सांगलीकडे पाठविण्यात आल्या आहेत. उद्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी मदत रवाना होईल. महावितरणच्या माध्यमातून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम वेगाने सुरू आहे. या पुरामुळे 30 उपकेंद्रातील 412 वाहिन्या, 9 हजार 489 रोहित्रे व 3 लाख 29 हजार 603 ग्राहक बाधीत झाले आहेत. त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. आतापर्यंत सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील 1 लाख 18 हजार 467 ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.
पासबुक, चेकची सक्ती नाही

पुरामुळे बाधीत झालेल्या कुटुंबांकडील पासबुक, चेकबुक खराब झाले असल्याचे गृहीत धरून मदत देताना बँकांनी युआयडीच्या माध्यमातून बाधीतांना पैसे देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच शासनाकडून देण्यात येणाऱ्या सानुग्रह अनुदानापैकी 5 हजार रुपयांची मदत प्रत्येक कुटंबांना रोख स्वरूपात देण्यात येणार आहे. तर उर्वरीत रक्कम त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. तसेच बाधित क्षेत्रातील 469 एटीएम पैकी 218 बंद असून 251 एटीएम सुस्थितीत आहेत. बंद एटीएम तातडीने दुरूस्त करून घेण्याबरोबरच प्रत्येक एटीएममध्ये पुरेशी रक्कम ठेवण्याच्या सुचना बँकांना देण्यात आल्या आहेत. तसेच एसबीआय व ट्रेझरी बँकांनी जिल्हा मध्यवर्ती बँकांना तातडीने रक्कम उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोणत्याही मृत जनावरांचे स्वतंत्र शवविच्छेदन न करता संबंधित बाधीतांना वीमा रक्कम मंजूर करण्याच्या सूचना वीमा कंपन्यांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पाणी पुरवठा योजनांच्या दुरूस्तीला प्राधान्य

पुणे विभागातील बाधीत झालेल्या पाणी पुरवठा योजना प्राधान्याने दुरूस्त करून पूर्ववत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार काम सुरू आहे. सध्या मीरज शहराच्या पाणी पुरवठा योजनेतून सांगली शहराला तर कोल्हापूर शहराला शिवाजी विद्यापीठाच्या पंपींग स्टेशनवरून पाणी पुरवठा केला जात आहे. कोल्हापूर आणि सांगली शहरांचा पाणीपुरवठा शहरातील पाणीपातळी घटताच करण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण भागातील पिण्याच्या पाणी पुरवठा योजना प्राधान्याने दुरूस्त करण्यात येणार आहेत.

स्वच्छतेचे काम सुरू
पुरामुळे बाधीत झालेल्या ठिकाणी कचऱ्यामुळे साथीचे आजार पसरू नयेत म्हणून स्वच्छतेची कामे सुरू करण्यात आली आहेत. ज्या ठिकाणी पाणी ओसरले आहे त्याठिकाणी स्वच्छता सुरू करण्यात आली आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातील कचरा व्यवस्थापनासाठी टेंडर काढण्यात येणार असून मशीनव्दारे स्वच्छता करण्यात येणार आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्यावतीने स्वच्छता कार्मचाऱ्यांची टीम व साहित्य बाधीत भागात रवाना करण्यात आले आहे.
आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com