पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

तुम्हाला मदत द्यायची आहे... ?
तुम्हाला औषधे, कपडे, शैक्षणिक साहित्य किंवा धान्यासारखा कोरडा शिधा द्यायचा असेल तर या मंडळांशी संपर्क साधू शकता. या वस्तूंच्या संकलनानंतर कोल्हापूरला नेमकी मदत कुठे पोचवायची, त्याची माहिती ‘सकाळ’ घेणार असून, योग्य त्या ठिकाणी ती मदत पोचेल, याची खातरजमा करणार आहे.

पुणे - पूरग्रस्तांसाठी वस्तू संकलन करण्याची जबाबदारी चार मंडळांकडे सोपविण्याचा निर्णय गणेशोत्सव मंडळांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ‘सकाळ’मध्ये झालेल्या बैठकीत घेतला. त्यानंतर मंडळांकडे मदतीचा ओघ सुरू झाला आहे. त्यात धान्य-कपड्यांपासून औषधांचा समावेश आहे. वस्तू स्वीकारण्याची स्वतंत्र यंत्रणा मंडळांनी उभी केली आहे.

कोल्हापूर आणि सांगलीतील महापुराचा फटका किमान साडेतीन लाख नागरिकांना बसला असून, त्यांना तातडीच्या मदतीबरोबरच दीर्घकालीन पुनर्वसनाचीही गरज निर्माण झाली आहे. धान्य, कपडे, औषधे, शैक्षणिक साहित्य अशा वस्तूंची मदत गोळा करण्याची जबाबदारी चार मंडळांकडे सोपविली आहे. पुण्यातील मंडळे, संघटना तसेच व्यक्तींनी जमा केलेल्या वस्तू नेमक्‍या कुठे द्याव्यात, असा प्रश्‍न पडतो. संकलन आणि वाटपात सुसूत्रता येण्यासाठी त्या वस्तू जमा करण्याची जबाबदारी चार मंडळांनी उचलली. त्याचे वृत्त ‘सकाळ’च्या रविवारच्या अंकात प्रसिद्ध झाल्यानंतर मदतीचा ओघ सुरू झाला आहे.

‘‘मला सकाळपासून सारखे फोन येत असून कपड्यांचे ढीगच्या ढीग जमा होऊ लागले आहेत,’’ असे तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर यांनी सांगितले. एका दिवसात २०० जणांनी कपडे जमा केले. हे काम मंडळाचे प्रदीप इंगळे, प्रवीण सोनार करीत आहेत. कोशाध्यक्ष नितीन पंडित म्हणाले, तुळशीबागेतील शास्त्री चेंबर मार्केटमधील व्यापाऱ्यांनी १५ हजारांची मदत ‘सकाळ रिलीफ फंड’ला दिली आहे. भाऊ रंगारी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र गुप्ता म्हणाले, ‘‘गहू, तांदूळ, डाळी आदी वस्तू मंडळात येण्यास सुरवात झाली आहे. त्यात महिलांचा मोठा वाटा आहे. आठ बॉक्‍स तसेच दुधाच्या पावडरचे डबे जमा झाले असून, १५० जणांनी विचारणा केली.’’ विश्रामबाग मंडळाचे अध्यक्ष नितीन कोतवाल म्हणाले, ‘‘औषध दुकानदारांनी प्रतिसाद देण्यास सुरवात केली असून, काही गणेश मंडळांकडूनही औषधे जमा झाली आहेत.’’ दर्शन मित्र मंडळाचे अध्यक्ष गणेश घोष म्हणाले, ‘‘वह्या-पुस्तके येण्यास सुरवात झाली असून, अनेक जण चौकशी करीत आहेत.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood Affected Help Fund