पूरग्रस्त खरे की खोटे शोधण्याचे पालिकेचे फर्मान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

ज्या घरांचे नुकसान झाले, त्यांचे पंचनामे अंतिम टप्प्यात आहेत. त्यानुसार लोकांना मदत मिळेल. पण या पंचनाम्यांनंतर प्रत्यक्ष लोकांकडून माहिती घेण्यात येणार आहे. ज्यामुळे नुकसान आणि मदतीची वस्तुस्थिती कळू शकणार आहे.   
- सुनील इंदलकर, आपत्ती व्यवस्थापन विभागप्रमुख

पुणे - पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्या घरांच्या पंचनाम्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. कोणत्या भागात किती घरांचे नुकसान झाले, त्यांचेच पंचनामे झाले आहेत का, नेमक्‍या लोकांना मदत मिळत आहे का, याची खातरजमा करण्याचा आदेश महापालिका प्रशासनाने सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिला आहे. तसेच, पंचनाम्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून मागविण्यात आला आहे. 

पावसामुळे मुळा-मुठा नदीपात्रालगतच्या विविध भागांतील सुमारे साडेअकराशे घरांत पाणी शिरल्याचा अंदाज आहे. पूरग्रस्तांना राज्य सरकारतर्फे मदत करण्यात येणार असून, ज्या घरांचे नुकसान झाले आहे, त्याची पाहणी करून नोंदी करण्याचा आदेश राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला दिला आहे. त्यानुसार रविवारी दुपारपर्यंत नऊशेहून अधिक घरांचे पंचनामे झाल्याचा दावा महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केला आहे. काही भागांत पंचनामे होत नसल्याची तक्रार आली आहे. या पार्श्‍वभूमीवर पाणी शिरून नुकसान झालेल्या भागांतील पंचनाम्याची माहिती गोळा करण्याचा आदेश क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood Affected Searching Municipal