पिंपरीत पूरग्रस्त निधीवाटपात गोंधळ 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

सांगवी, दापोडी, कासारवाडी, फुगेवाडी या भागातील 400 ते 500 लाभार्थ्यांचे पंचनामे झालेले नाहीत. अन्नधान्यासाठी लाभार्थ्यांची नावे यादीत नाहीत. सांगवीतील मुळानगर, अभिनवनगर, जयमालानगर, प्रियदर्शनीनगर, संगमनगर, ममतानगर, दापोडीतील गुलाबनगर, कासारवाडीतील वंजार चाळ परिसरातील पाहणीत हे आढळून आले.

पिंपरी : शहरातील चार हजार पूरग्रस्त कुटुंबांचे पंचनामे पूर्ण झाले असून, त्यातील केवळ 285 बाधितांना लाभ मिळाला आहे. नदीलगतचा काही भाग पूरग्रस्त याद्यांमधून वगळला असून, त्यातील 3500 कुटुंबे बाधित झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे एकूणच निधी वाटपात गोंधळाचे चित्र आहे. 

सांगवी, दापोडी, कासारवाडी, फुगेवाडी या भागातील 400 ते 500 लाभार्थ्यांचे पंचनामे झालेले नाहीत. अन्नधान्यासाठी लाभार्थ्यांची नावे यादीत नाहीत. सांगवीतील मुळानगर, अभिनवनगर, जयमालानगर, प्रियदर्शनीनगर, संगमनगर, ममतानगर, दापोडीतील गुलाबनगर, कासारवाडीतील वंजार चाळ परिसरातील पाहणीत हे आढळून आले. सांगवी मुळानगर झोपडपट्टी व लगतचा परिसरातील अडीच ते तीन हजार घरे पाण्याखाली गेली होती. सामाजिक कार्यकर्ते व नगरसेवक याद्या तयार करणार असल्याचे सांगितले. यासाठी आधारकार्ड, शिधापत्रिका, बॅंक खाते यांची माहिती लागणार असल्याचे सांगितले. मात्र, पुराच्या पाण्यात सगळे वाहून गेल्याने अनेकांकडे कागदपत्रे नाहीत. त्यांची यादीत नावे समाविष्ट नाहीत. संबंधितांच्या खात्यात 16 ऑगस्टला पूरग्रस्तांच्या खात्यात निधी जमा होणार आहे. 
आकुर्डी तहसील कार्यालयाकडून हे सर्वेक्षण होत आहे. काही ठिकाणी सर्वेक्षण कर्मचारी बाधितांपर्यंत पोचले नाहीत, असे सांगवी अभिनवनगरमधील परिसरातील रंजना शिंदे, संजय गायकवाड, भानुदास सोनवणे यांनी सांगितले. 

मदतीबाबत अनभिज्ञ 
पूरग्रस्तांना किती लाभ मिळणार? खात्यावर किती रक्कम जमा होणार? धान्य किती मिळणार व कसे ? असे अनेक प्रश्‍न आहेत. शिधापत्रिकेवर प्रत्येकी बाधित कुटुंबांना 10 किलो तांदूळ व गहू वाटप केले जाणार आहे. मात्र, काही कुटुंबांना पाच किलो धान्य मिळाले आहे. तर काहींना दोन वेळा धान्य दिले गेले आहे. त्यामुळे शिधा वाटपातही गोंधळ आहे. 

प्रलंबित पूरग्रस्तांसाठी सहा कोटीची मागणी सरकारकडे केली आहे. मंडल अधिकाऱ्यांकडून पंचनामे पूर्ण झाले आहेत. लाभार्थ्यांच्या याद्या अन्नधान्य वितरण विभागाला दिल्या आहेत. 40 ते 50 कुटुंबे लाभापासून राहिली असतील. 
- गीता गायकवाड, तहसीलदार 
 
प्राप्त निधी 1.25 कोटी 
बाधित खात्यांवर जमा रक्कम 1.25 लाख 
एकूण पूरग्रस्त चार हजार 
प्रत्यक्ष लाभार्थी 285 कुटुंबे 
निधी वाटप 52 लाख 50 हजार 
प्रलंबितांसाठी मागणी 6 कोटी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: flood relief fund fraud in pcmc