पुरामुळे महामार्गावर अडकलेल्यांच्या मदतीला "विघ्नहर्ता'

विजय जाधव
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

कोल्हापूर व सांगली येथे आलेल्या पुरामुळे पुणे- सातारा महामार्गावर अडकून पडलेल्या प्रवाशांना व वाहनचालकांना आणि 24 तास "ऑन ड्यूटी' असलेल्या पोलिसांना किकवी (ता. भोर) येथील विघ्नहर्ता पतसंस्थेच्या वतीने पाणी, चहा, नाष्टा व भोजनाची सोय करण्यात आली. गुरुवारी (ता. 8) एका दिवसात तीनशेहून अधिक प्रवाशांना याचा लाभ झाला.

भोर (पुणे) : कोल्हापूर व सांगली येथे आलेल्या पुरामुळे पुणे- सातारा महामार्गावर अडकून पडलेल्या प्रवाशांना व वाहनचालकांना आणि 24 तास "ऑन ड्यूटी' असलेल्या पोलिसांना किकवी (ता. भोर) येथील विघ्नहर्ता पतसंस्थेच्या वतीने पाणी, चहा, नाष्टा व भोजनाची सोय करण्यात आली. गुरुवारी (ता. 8) एका दिवसात तीनशेहून अधिक प्रवाशांना याचा लाभ झाला. 

पुणे- मुंबईहून कोल्हापूर- बंगळूरकडे जाणारी मोठी वाहने कोल्हापूर व सांगली येथे आलेल्या पुरामुळे पोलिसांनी पुणे- सातारा महामार्गावर धांगवडी (ता. भोर) येथे थांबविली आहेत. त्यातील प्रवाशांना कित्येक तास गाडीमध्ये ताटकळत बसावे लागले. प्रवाशांना पाणी व जेवणाची चिंता वाटू लागली. यामध्ये महिला व ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त होती. 

याबाबतची माहिती मिळताच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भोरचे माजी तालुकाध्यक्ष व विघ्नहर्ता पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत बाठे यांनी या प्रवाशांच्या भोजनाची सोय करण्याचे ठरविले. त्यानुसार विघ्नहर्ता पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी गुरुवारी सकाळी भोजनाच्या पॅकेटचे वाटप केले. धांगवडी येथील अडसिद्धनाथ मंदिराच्या परिसरात काही प्रवाशांच्या जेवणाची सोय करण्यात आली. 

या वेळी उद्योजक सौरभ बाठे, राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रेय दराडे, माजी उपसभापती लहू शेलार, विघ्नहर्ता पतसंस्थेचे व्यवस्थापक काळूराम महांगरे, हवालदार अनिता रवळेकर आदी उपस्थित होते. केंजळचे उपसरपंच महेश बाठे, उत्तम बाठे, गणेश भालघरे, पांडुरंग बाठे, किरण येवले, पंढरीनाथ भालघरे आदींनी प्रवाशांना भोजन वाटण्याची व्यवस्था केली.

या उपक्रमाबद्दल अनेक महिला प्रवाशांनी व ज्येष्ठ नागरिकांनी विघ्नहर्ता पतसंस्थेला व चंद्रकांत बाठे यांना धन्यवाद दिले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood relief for passengers stranded on the highway at bhor