इंदापुरात चारा छावणीत घुसले पुराचे पाणी 

राजकुमार थोरात
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

वीर धरणातून मोठ्या प्रमाणात सोडलेल्या पाण्यामुळे नीरा नदीला पूर आला आहे. या पुराचे पाणी निरवांगी (ता. इंदापूर) येथील चारा छावणीमध्ये घुसल्याने शेतकऱ्यांची धांदल उडाली. 

वालचंदनगर (पुणे) : वीर धरणातून मोठ्या प्रमाणात सोडलेल्या पाण्यामुळे नीरा नदीला पूर आला आहे. या पुराचे पाणी निरवांगी (ता. इंदापूर) येथील चारा छावणीमध्ये घुसल्याने शेतकऱ्यांची धांदल उडाली. 

निरवांगीमध्ये नीरा नदीजवळ संत सोपानदेव महाराज पालखीतळावर सोनाई कृषी कारखान्याच्या माध्यमातून अध्यक्ष दशरथ माने व जिल्हा परिषदेचे सभापती प्रवीण माने यांनी चारा छावणी सुरू केली आहे. या छावणीमध्ये अठरापेक्षा जास्त जनावरे आहेत. वीर धरणातून नीरा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यामुळे नीरा नदीला पूर आला आहे. या पुराचे पाणी सोमवारी (ता. 5) रात्री छावणीमध्ये घुसण्यास सुरवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ झाली. जनावरांना तातडीने बाहेर काढून रस्त्यालगत उभे करण्यात आले. 

दरम्यान, नीरा नदीमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असून, छावणी नदीकाठी असल्याने पुराचे पाणी कमी होईपर्यंत निरवांगीची छावणी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याचे तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी सांगितले. 

नुकसान भरपाई देण्याची मागणी 
जिल्हा परिषदेचे सभापती प्रवीण माने यांनी आज सकाळी छावणीला भेट देवून शेतकऱ्यांना आधार दिला. तसेच, नदीकाठच्या निरवांगी गावाला भेट देवून शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांनी उन्हाळ्यामध्ये टॅंकरने पाणी घालून जगविलेल्या डाळिंबाच्या बागा पुराच्या पाण्याने वाहून गेल्या असून, नदीकाठच्या गावातील पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली. या वेळी निरवांगीचे माजी सरपंच दशरथ पोळ, दादा भाळे, विठ्ठल पवार, रवी पाटील आदी उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The flood water entered the fooder camp in indapur