भीमेच्या पुरामुळे जनजीवन विस्कळित 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने आलेल्या पुरामुळे मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील पूल व रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांचा जनसंपर्क तुटल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. 

मांडवगण फराटा (पुणे)  : भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने आलेल्या पुरामुळे मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील पूल व रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांचा जनसंपर्क तुटल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. 

येथील वडगाव रासाई रस्ता, इनामदार वस्ती रस्ता, गणेगाव, बाभूळसर रस्ता व भीमानदीवरील कोल्हापुरी बंधारा, नवीनच बांधलेला पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना बाहेर गावी जाणे अवघड झाले आहे. जे ग्रामस्थ रविवारी सकाळी बाहेरगावी गेले होते, त्यांना पुन्हा गावाकडे येणे शक्‍य झाले नाही. धरणक्षेत्रात चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीची पाणीपातळी वाढली आहे. नदीचे पाणी ओढ्यांमधून रस्त्यावर आल्यामुळे या परिसरातील वाहतूक बंद झालेली आहे. 

वडगाव रासाई व मांडवगण फराटा येथील भीमा नदीवरील पूल, तसेच सादलगाव व मांडवगण येथील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यावरील वाहतूक बंद झाली आहे. नदीचे पाणी ओढ्यांमधून रस्त्यावर आल्यामुळे या परिसरातील वाहतूक बंद झालेली आहे. या परिसरातील मांडवगणकडून शिरसगाव, सादलगाव, आंधळगाव, बाभूळसर बुद्रुक, गणेगाव या गावांकडे जाणारे रस्ते पाणी आल्यामुळे बंद झालेले आहेत. मांडवगण फराटा गावातील चंदननगर, लमाण वस्ती, नाईक वाडा या परिसरातील अनेक घरे पुराच्या पाण्याखाली गेल्याने घरातील धान्य तसेच इतर चीजवस्तू पाण्याने भिजून मोठे नुकसान झाले आहे. 

रस्त्यांवरील छोट्या पुलावर पाणी येऊन दळणवळण बंद झाले आहे. नदीकाठावरील आपल्या विद्युत मोटारी काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली होती. 
 
पिकांचे नुकसान 
शेतामध्ये पाणी घुसल्याने पिकांचे नुकसान झाले. रविवारपासून भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने प्रशासनाने नदी काठावरील गावांना व पूररेषेच्या आतील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा दिला होता. नदीला पूर आल्यामुळे या परिसरातील ओढ्यांच्या पाण्यात मोठी वाढ झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The floods of the Bhima River disrupted lives