#PuneRains : पुरामुळे सुपे व मोरगाव मार्गावरील वाहतूक ठप्प; काळ्या ओढ्यात ट्रक उलटला 

#PuneRains : पुरामुळे सुपे व मोरगाव मार्गावरील वाहतूक ठप्प; काळ्या ओढ्यात ट्रक उलटला 

सुपे : बुधवारी दिवसभर झालेल्या जोरदार संततधारेमुळे नद्या, नाल्यांना पूर आल्याने बारामती तालुक्यातील काऱ्हाटीचा संपर्क तुटला. सुप्यात राज्यमार्गावरील पुलाशेजारील रस्ता वाहिल्याने तसेच, काळ्या ओढ्याचे पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली. तर, बोरकरवाडीत अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने ग्रामस्थ हैराण. परिसरात उभ्या पीकांचे नुकसान झाल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली.

झालेल्या पावसाने गेल्या अनेक वर्षांच्या इतिहास मोडला. बुधवारी सुपे परिसरात एकाच दिवसात १४० मिमी पावसाची नोंद झाली आहे. सतत दुष्काळी भागातील या गावात वार्षिक पर्जन्यमान सरासरी ३५० मिमी असते. यंदा ऑक्टोबर अखेर सुमारे साडेसातशे मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती कामगार तलाठी दीपक साठे यांनी दिली. बोरकरवाडी, खंडूखैरेवाडी, भोंडवेवाडी परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने धान्याचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी जमिनी वाहिल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याचे साठे यांनी सांगितले.

काऱ्हाटीच्या कऱ्हा नदीच्या बंधाऱ्यावरून पुराचे पाणी वाहत असल्याने त्याखाली असलेला बैठापुल, स्मशानभूमी, नळपाणी पुरवठ्याची विहिरही पाण्याखाली आहे. तर बंधाऱ्याचा फुगवटा व दोन्ही बाजुने वाहणाऱ्या ओढ्याला आलेल्या पाण्यामुळे जाधववस्ती व सुप्याशी काऱ्हाटीकरांचा संपर्क तुटला असल्याची माहिती ग्रामसेवक दीपक बोरावके, धीरज लोणकर यांनी दिली. येथील पुलाची उंची वाढवण्याची ग्रामस्थांची जुनी मागणी आहे. रब्बीची ५० टक्के पेरणी रखडल्याची माहिती येथील के. एस. लोणकर यांनी दिली.

बोरकरवाडीत रात्री ७ ते ८ च्या दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे ५० घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झाल्याची माहिती माजी उपसरपंच दत्तात्रेय कदम यांनी दिली. विठ्ठल मंदीर व शाळेतही पाणी शिरले होते. तलावाच्या सुमारे ४०० फुट लांबीच्या सांडव्यावरून सुमारे चार फुट पाणी वाहत होते. वीजेचे खांब पडले, रस्ते वाहून गेले. ओढ्याकाठच्या लोकांना मध्यरात्री सुरक्षित ठिकाणी हलवले. कांदा, मका व ऊसाचे नुकसान झाल्याचे अतुल हंबीर यांनी सांगितले. आंबीखुर्दला कऱ्हानदीला महापूर आल्याने शेतीचे व पीकांचे नुकसान झाल्याची माहिती रघुनाथ कुतवळ, लालभाई शेख यांनी दिली. शिरूर-सातारा राज्य महामार्गावरील सुपे-मोरगाव दरम्यान काळ्या ओढ्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहूतक ठप्प होती. रात्री दीडच्या दरम्यान मोरगावकडून आलेल्या एक बारा चाकी कंटेनर ट्रक पुराच्या पाण्याने उलटला. प्रसंगावधान राखून स्थानिक तरूणांनी दोर टाकून चालक व क्लिनरला पाण्यातून सुरक्षित बाहेर काढल्याची माहिती किरण बांदल यांनी दिली.

बाबुर्डीच्या खोमणेआळीत व ढोपरेमळ्यात पुराचे पाणी शिरल्याची माहिती सरपंच अनिता जगताप यांनी दिली. तर शेरेवाडीत कलमी रोपे वाहून लाखो रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती उपसरपंच नितीन लडकत यांनी दिली. सुपे तलावाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने राज्य महामार्गावरील पुलाशेजारील रस्ता वाहिल्याने वाहतूक ठप्प होती. ओढ्याचे पाणी ग्रामसचिवालयाच्या इमारतीला लागले होते. गावांतर्गत वाहतूकही काही काळ ठप्प झाली होती. ओढ्यावरील गावांतर्गत पुल वाहिल्याने नुकसान झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.  

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com