पुणे जिल्ह्यातील नद्यांना पूर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात गुरुवारपासून (ता. 25) सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, धरणांचा पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शेतकरी आनंदित झाला आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील नीरा, गुंजवणी, वेळवंड, मुळा, मुठा, भीमा, इंद्रायणी, मीना, कुमंडला, घोड या नद्यांना पूर आला आहे.

पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात गुरुवारपासून (ता. 25) सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, धरणांचा पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शेतकरी आनंदित झाला आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील नीरा, गुंजवणी, वेळवंड, मुळा, मुठा, भीमा, इंद्रायणी, मीना, कुमंडला, घोड या नद्यांना पूर आला आहे.

मावळ खोऱ्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे आळंदीत इंद्रायणी नदीला पूर आहे. पुराच्या पाण्यामुळे इंद्रायणी नदीवरील संपूर्ण घाट बुडाला आहे. भक्ती सोपानपूल पाण्याखाली गेला आहे. जुन्या दगडी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. 

खेड तालुक्‍यातील कडूस- कारामळी येथील कुमंडला नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्याचा दळणवळण संपर्क ठप्प झाला आहे. खेड तालुक्‍यातील भामा आसखेड धरणात आज सकाळी सहापर्यंत 58.44 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. अवघ्या 24 तासांत धरण क्षेत्रात 116 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, धरणात एका दिवसात जवळपास एक टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. 

भोरमध्ये नीरा नदीला पूर आला आहे. नारा देवघर, भाटघर व गुंजवणे धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. शुक्रवारी दिवसभर झालेल्या पावसामुळे नीरा देवघर धरणाच्या पाणीसाठ्यात 4 टक्के; तर भाटघर धरणाच्या पाणीसाठ्यात 1.25 टक्के वाढ झाली आहे. वीर धरणामधील पाणीसाठ्यातही 6.16 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. 11.93 टीएमसी क्षमता असलेल्या नीरा देवघर धरणात शनिवारी सकाळी 55.67 टक्के; तर 23.75 टीएमसी क्षमता असलेल्या भाटघर धरणामध्ये 51.80 टक्के पाणीसाठा झाला आहे. 

जुन्नर तालुक्‍याच्या पश्‍चिम आदिवासी भागातील मीना नदीच्या खोऱ्याला गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने अक्षरश झोडपले आहे. आपटाळे ते शिंदे या गावांना जोडणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पावसाचा जोर इतका आहे की, या पुलावरून व पुलाला जोडणाऱ्या रस्त्यावरून तब्बल तीन फुटाहुन पाणी वाहत आहे. 

आंबेगाव तालुक्यात हुतात्मा बाबू गेनू जलाशयाच्या (डिंभे धरण) पाणलोट क्षेत्रात भीमाशंकर-आहुपे खोऱ्यात संततधार पाऊस सुरु आहे. शनिवारी (ता. 27) दुपारी एक वाजेपर्यंत 49 टक्के धरण भरले. आज सकाळी आठ वाजता धरण 46.36 टक्के भरले होते. गोहे खोऱ्यातील पाझर तलावातील पाणी सांडव्या वरून वाहत आहे. त्यामुळे घोडनदीला पूर आला आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Floods of rivers in Pune district