पीठ गिरण्यांमध्ये वजनकाटे बंधनकारक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 जानेवारी 2019

गेली अनेक वर्षे धान्य दळणाला देऊन शांतपणे पीठ घेऊन जातो. पीठ कमी आले तरी काय करणार, पुन्हा याच गिरणीत यावे लागत असल्याने तक्रार करत नाही. 

- मालन शिंदे, ग्राहक, गांधीनगर. 

येरवडा : शहरातील सर्वच पीठ गिरण्यांनी धान्य घेताना व पीठ देताना वजन काट्यावर वजन करून देणे बंधकारक आहे. मात्र, बहुतेक पीठ गिरण्यांमध्ये वजनकाट्यांचा अभाव असल्याचे निदर्शनास आल्याचे वैध मापनशास्त्र विभागाने सांगितले. तर, प्रत्येक पीठ गिरणीत वजन काटा असून, ग्राहकांनी मागणी केल्यास पीठ वजन करून दिले जाईल, असे पुणे शहर पीठ गिरणी मालक संघाचे अध्यक्ष लुईस सांगळे यांनी सांगितले. 

शहरात बहुतेक पीठ गिरण्यांमध्ये वजनकाट्यांचा अभाव आहे. त्यामुळे ग्राहकांनी दिलेल्या धान्याचे अचूक मापात पीठ मिळेलच, याची शाश्‍वती नसते. ग्राहकही पीठ मोजून घेत नाहीत. तर, अनेकांना पीठ गिरण्यांमध्ये वजनकाटे असतात, याची माहितीच नसते. या संदर्भात वैध मापनशास्त्र विभागाच्या उपनियंत्रक विभागाने नुकतेच ग्राहक दिनाचे (24 डिसेंबर) औचित्य साधून सर्व पीठ गिरण्यांमध्ये वजनकाटे बंधनकारक असल्याचे प्रसिद्धिपत्रकाव्दारे कळविले आहे. "सकाळ'प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत अनेक गिरण्यांमध्ये वजनकाटे नसल्याचे दिसून आले. तर, ग्राहकांनी असे वजनकाटे आहेत, हे माहितीच नसल्याचे सांगितले. 

सर्वच पीठ गिरण्यांना वजनकाटे ठेवणे बंधकारक आहे. त्यांनी धान्य व पीठ वजन करून देणे आवश्‍यक आहे. त्यांनी तसे नाही केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. 

- सीमा बैस, उपनियंत्रक, वैध मापनशास्त्र विभाग 

शहरातील बहुतेक गिरण्यांमध्ये वजनकाटे आहेत. ग्राहकांनी मागणी केल्यास त्यांना पीठ वजन करून दिले जाईल. 

- लुईस सांगळे, अध्यक्ष, पीठ गिरणी मालक संघ, पुणे शहर 
 

Web Title: Flour mills Weight Counter is Mandatory