फ्लॉवर रोपांना गड्डा लागेना

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 एप्रिल 2018

महाळुंगे पडवळ - आंबेगाव आणि जुन्नर तालुक्‍यात झुआरी कंपनीच्या ‘ममता फ्लॉवर’ला लागवडीच्या ८० दिवसांनंतरही सुमारे ९५ टक्के झाडांना गड्डे आले नाहीत. त्यामुळे या दोन्ही तालुक्‍यांतील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, खेड विभागाच्या उपविभागीय कृषी अधिकारी संगीता माने आणि तालुका कृषी अधिकारी संजय विश्‍वासराव यांनी नांदूर (ता. आंबेगाव) येथे भेट देऊन पिकाचा पंचनामा केला आहे. 

महाळुंगे पडवळ - आंबेगाव आणि जुन्नर तालुक्‍यात झुआरी कंपनीच्या ‘ममता फ्लॉवर’ला लागवडीच्या ८० दिवसांनंतरही सुमारे ९५ टक्के झाडांना गड्डे आले नाहीत. त्यामुळे या दोन्ही तालुक्‍यांतील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, खेड विभागाच्या उपविभागीय कृषी अधिकारी संगीता माने आणि तालुका कृषी अधिकारी संजय विश्‍वासराव यांनी नांदूर (ता. आंबेगाव) येथे भेट देऊन पिकाचा पंचनामा केला आहे. 

केतन उल्हास वाळूंज (वाळुंजस्थळ- नांदूर, ता. आंबेगाव), संतोष यशवंत कबाडी (पिंपळगाव सिद्धनाथ, ता. जुन्नर), अशोक प्रल्हाद पापडे (रा. कबाडवाडी-पाडळी, ता. जुन्नर), सचिन बबन भोर (रा. वडगाव सहाणे, ता. जुन्नर) या शेतकऱ्यांचे फ्लॉवरला गड्डे न आल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी केतन वाळूंज यांनी याबाबत आंबेगाव तालुका कृषी कार्यालयाकडे तक्रार दाखल केली आहे. उपविभागीय कृषी अधिकारी माने, तालुका कृषी अधिकारी विश्‍वासराव, शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष प्रभाकर बांगर, ग्रामविकास अधिकारी जनार्दन नाईकडे यांनी घटनास्थळी भेट देऊन फ्लॉवर पिकाची पाहणी केली.       

याबाबत शेतकरी वाळूंज म्हणाले, ‘‘जानेवारी महिन्यात दीड एकर क्षेत्रात १५ हजार फ्लॉवर रोपांची लागवड केली असून अद्याप त्याला गड्डे आलेले नाहीत. पाच टक्के झाडांना आलेल्या गड्ड्यांवरही लव असल्याने तेही खराब आहेत. कंपनीने ६० दिवसांत फ्लॉवरची तोडणी होईल, असे सांगितले होते. प्रत्यक्षात ७५ दिवस होऊनही फ्लॉवरला गड्डे आले नाहीत. कंपनीचे अधिकारी नुसते भेट देऊन जातात; परंतु नुकसान भरपाईबाबत ब्र शब्दही काढत नाहीत. विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे देतात. रोपे, खते, औषधे असा एकूण ७५ हजार रुपये खर्च झाला आहे. आताच्या बाजारभावानुसार माझे जवळपास तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे,’’ अशीच परिस्थिती जुन्नर तालुक्‍यातील शेतकऱ्यांची आहे.

नुकसान भरपाई द्या; अन्यथा गुन्हा - बांगर
‘‘यापूर्वी टोमॅटोबाबतही अशीच शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. सरकारकडून कारवाई होत नसल्यामुळे कंपन्यांचे अधिकारी निर्ढावलेले आहेत. फ्लॉवरला गड्डे न आल्याने शेतकऱ्यांचे दहा ते बारा लाखांचे नुकसान झाले आहे. कंपनीने योग्य ती नुकसान भरपाई द्यावी; अन्यथा कृषी विभागाने कंपनीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा,’’ अशी मागणी शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी केली.

फ्लॉवर पिकाचा अहवाल कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केला आहे. वातावरणातील बदलामुळे फ्लॉवर पिकाला गड्डे लागले नाहीत. नुकसानभरपाईबाबत कंपनीचे व्यवस्थापन योग्य तो निर्णय घेईल.  
- अमोल टेकाडे, जिल्हा प्रतिनिधी, झुआरी कंपनी 

Web Title: flower loss