फुलांच्या सजावटीतून "फुलतेय' आयुष्य

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑगस्ट 2016

फुलांची सजावट करणे हा थोडा वेगळा आणि कलात्मक व्यवसाय आहे. कल्पकतेने एखादी वस्तू आपण किती चांगल्या प्रकारे सजवू शकतो, हे यातून शिकायला मिळाले. कमी गुंतवणुकीत रोजगार मिळवण्याचे हे एक चांगले साधन आहे. 

- किरण चव्हाण, प्रशिक्षणार्थी

पुणे -  वाढदिवस, लग्न समारंभ, धार्मिक वा सांस्कृतिक कार्यक्रम असो, त्याची शोभा वाढविण्यासाठी फुलांची सजावट हवीच. देश-विदेशातील विविध फुले सहज उपलब्ध होत असल्याने सजावटीत वैविध्य आले आहे. ते करण्यासाठी खास कौशल्य विकसित होत असून, त्याला व्यावसायिक स्वरूप आले आहे. पारंपरिक व्यवसायाऐवजी "फ्लॉवर डेकोरेशन‘ने युवकांच्या सर्जनशीलतेला साद घातली आहे. 

 

फुलांच्या सजावटीसाठी कुशल कारागीर मिळत नाहीत. त्यामुळे शहरी भागातील आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी यार्दी सॉफ्टवेअर कंपनी आणि स्नेह फ्लोरिस्ट यांच्यातर्फे शहरात फुलांच्या विविध प्रकारच्या सजावटीचे विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे प्रशिक्षण घेऊन शेकडो होतकरू तरुण स्वतःचा रोजगार सुरू करीत आहेत. 

 

याबाबत "यार्दी‘चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत पाटणकर म्हणाले, ""कंपनीच्या "सीएसआर‘ उपक्रमांतर्गत वस्ती विकास प्रकल्प विभागातर्फे हा उपक्रम घेतला जात आहे. फुलांच्या सजावटीचे पाच दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. शहरातील विविध प्रभागांमध्ये तेथील गणेश मंडळे व सामाजिक कार्यकर्ते यांच्या मदतीने स्थानिक बेरोजगारांची बैठक घेतली जाते. त्यांना या उपक्रमांची माहिती देऊन त्यांच्या पसंतीच्या उपक्रमात सामावून घेतले जाते. इतकेच नव्हे तर या तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा यासाठी संस्थेतर्फे आर्थिक साहाय्यही केले जाते.‘‘ 

 

नुकत्याच झालेल्या प्रशिक्षण उपक्रमात "सिंगल रोझ डेकोरेशन‘, "हॅंड बुके‘, "सेंटरपीस बुके‘ स्टेज सजावट आणि कार डेकोरेशन अशा फुलांच्या महत्त्वपूर्ण सजावटीचे तंत्र आणि त्यासाठी आवश्‍यक व्यावसायिक गोष्टी यांचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाची चाचणी घेण्यासाठी या विद्यार्थ्यांना कंपनीतर्फे एक उपक्रम देण्यात आला. त्यासाठी लागणारा खर्च कंपनीने केला. या उपक्रमाचा कौशल्यावर आधारित रोजगार निर्मितीसाठी उपयोग होत असल्याचे "स्नेह फ्लोरिस्ट‘चे संचालक पंढरीनाथ म्हस्के यांनी सांगितले. 

 

Web Title: Flowering Decorate own life

टॅग्स