तापाने मुले फणफणली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

पालकांनी काय करावे?
मुलांना शाळेत पाठवू नका.
त्यांना पूर्ण विश्रांती द्या.
भरपूर पाणी द्या.
डॉक्‍टरांच्या सल्ल्याने औषधे द्या.

पुणे - शहर आणि परिसरातील लहान मुले तापाने फणफणू लागली आहेत. पावसाची उघडीप झाल्यानंतर विषाणूजन्य आणि फ्लूच्या प्रकारातील ताप मुलांना येत असल्याचे निरीक्षण बालरोग तज्ज्ञांनी नोंदविले आहे. 

शहरात गेल्या आठवड्यापर्यंत पाऊस सुरू होता. सध्याही ढगाळ वातावरण आहे. या सर्वांचा परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर होत आहे. सर्दी, ताप, खोकला, पोटाचे विकार यामुळे मुले आजारी पडत आहेत; परंतु यामुळे पालकांनी घाबरून न जाता योग्य उपचार घ्यावेत, असा सल्ला डॉक्‍टरांनी दिला आहे. 

याबाबत बालरोग तज्ज्ञ डॉ. सुनील गोडबोले म्हणाले, ‘‘तापाबरोबरच काही मुलांना सर्दी, खोकला; तर काहींना पोटाच्या तक्रारी आहेत. हा ताप कमी होण्यासाठी किमान दोन ते तीन दिवस लागतात. तोपर्यंत मुलांना तापाची साधी औषधे घेणे, भरपूर पाणी देणे आणि पूर्ण विश्रांती देणे आवश्‍यक आहे. यावर प्रकृती कशी सुधारते, हे पाहिले जाते.

त्यानंतर आवश्‍यकता पडल्यास प्रतिजैविके दिली जातात. या काळात मुलांना विश्रांती आवश्‍यक असल्याने त्यांना शाळेत पाठवू नये.’’

सध्या विषाणूजन्य तापाने मुले आजारी पडत असण्याची शक्‍यता जास्त आहे. कारण, प्रत्येक मुलाला प्रतिजैविके द्यावी लागत नाहीत. सध्या फ्लू आणि डेंगी यांची लक्षणे असणारी मुलेही दिसत आहेत. त्यामुळे वेळ पडली तरच वैद्यकीय चाचण्या कराव्या, त्याची घाई करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. 

बालरोग तज्ज्ञ डॉ. शरद आगरखेडकर म्हणाले, ‘‘तापाच्या रुग्णांची संख्या बाह्यरुग्ण विभागात वाढली आहे. यात शाळकरी मुलांची संख्या मोठी आहे.’’

का वाढतोय ताप?
सध्या हवेत ओलसरपणा आहे. गेल्या काही दिवसांपासून पाऊस थांबला असून ऊन पडत आहे. असे वातावरण विषाणूंचा फैलाव होण्यासाठी पोषक असते. त्यामुळे विषाणूजन्य तापाच्या रुग्णांची संख्या शहरात वाढली आहे. पावसाळ्यामुळे झालेली घाणही याला काहीअंशी कारणीभूत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flu Sickness Child Health Care