कॅशलेस व्यवहारावर भर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 डिसेंबर 2016

पिंपरी - शहरातील विविध बाजारपेठांत रविवारच्या सुटीचे औचित्य साधून नागरिकांनी किराणा सामान, गृहोपयोगी अत्यावश्‍यक साहित्य यांची खरेदी करण्यासाठी विविध मॉल्समध्ये आणि मोठ्या किराणा दुकानांमध्ये गर्दी केली होती. रोकड पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने मुख्यत्वे डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारेच खरेदी करण्याकडे नागरिकांचा भर होता. ज्यांच्याकडे कॅशलेस व्यवहारासाठी आवश्‍यक डेबिट - क्रेडिट कार्ड नाही, अशा सर्वसामान्य नागरिकांची मात्र आर्थिक कोंडी झाल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.

केंद्र सरकारने बॅंकेतून रक्कम काढण्यावर असलेले निर्बंध हटविले आहेत. मात्र, बॅंकांमध्ये असलेल्या नोटांच्या तुटवड्यामुळे ग्राहकांना रक्कम काढण्यासाठी निर्बंध आहेत. पर्यायाने नागरिकांचे पगार झालेले असताना देखील त्यांना बॅंकेच्या रांगेत थांबून दिवसभरात केवळ दोन ते चार हजार रुपयेच रोकड मिळत आहे. चलनतुटवड्यामुळे विविध बॅंकांनी एटीएम सेवा बंद ठेवली आहे. ज्या बॅंकांची एटीएम सेवा सुरू आहे, तेथील एटीएम मशिनमध्ये देखील दिवसभरातून काही ठराविक कालावधीसाठीच रक्कम मिळत आहे. पर्यायाने, नागरिकांची आर्थिक कोंडी होत आहे. ज्यांचे हातावर पोट आहे, अशा कष्टकरी, कामगारवर्गातील बऱ्याच नागरिकांकडे डेबिट - क्रेडिट कार्ड उपलब्ध नसल्याने त्यांना रविवारची सुटी असताना देखील आवश्‍यक खरेदी करणे जमले नाही.

मॉल्सबाहेर खरेदीसाठी रांगा
मॉल्समध्ये किराणा सामान, गृहोपयोगी साहित्य, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू, कपडे आदी सर्व प्रकारचे साहित्य एकाच ठिकाणी खरेदी करता येते. त्याचप्रमाणे, त्यांच्याकडे डेबिट - क्रेडिट कार्डद्वारे खरेदी करण्याची सुविधा मिळत असल्याने नागरिकांचा ओढा तेथे खरेदी करण्याकडे वाढला आहे. काही मॉल्स आणि सराफ व्यावसायिकांनी स्वॅपिंग मशिनवर कार्ड स्वॅप करून प्रत्येकी दोन हजार रुपये उपलब्ध करून देण्याची सुविधा दिली होती, त्यामुळे तेथे नागरिकांच्या रांगा लागलेल्या होत्या. मोठे किराणा दुकानदार, कापड व्यावसायिक, मोबाईल आणि इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंचे विक्रेते यांनी देखील कार्डद्वारे पेमेंटची सुविधा दिलेली आहे. मात्र, नागरिकांचा भर प्रामुख्याने किराणा मालाची आणि गृहोपयोगी अत्यावश्‍यक साहित्याची खरेदी करण्यावरच होता. त्यामुळे कापड दुकानदार, इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंचे विक्रेते यांच्याकडे तुलनेत कमी गर्दी पाहण्यास मिळाली.

Web Title: Focus on the cashless transaction