प्रत्येक तालुक्यात वृद्धाश्रम उभारण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार -  डॉ. नीलम गोऱ्हे 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

पुण्यातील कोंढवा येथे पुण्यधाम आश्रम, जनसेवा फाउंडेशन आणि ज्येष्ठांसाठी कार्यरत विविध संघटना, संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता.१७) ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध व जनजागृती या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. या परिसंवादाचे उदघाटन शिवशाहीर व जेष्ठ साहित्यिक बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते करण्यात आले. जेष्ठांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणाऱ्या शिवसेनेच्या प्रवक्त्या तथा स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रमुख मार्गदर्शन म्हणून परिसंवादामध्ये विचार मांडले.

कोंढवा : जेष्ठ नागरिकांच्या विविध प्रश्नांबाबत विधिमंडळात आमदार डॉ. निलम गोऱ्हे यांनी २८ मार्च, २०१८ ला लक्षवेधी उपस्थित केली होती. त्यावेळी ज्येष्ठ नागरिकांचे वय ६५ वरून ६० करू असे सामाजिक न्याय राज्यमंत्री यांनी आश्वासन दिले होते. परंतु, चार महिने झाले तरी ते अद्यापपर्यंत पूर्ण न झाल्याची खंत व्यक्त करत, ४ जुलैपासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये हा विषय पुन्हा सभागृहामध्ये मांडेन असा शब्द स्त्री आधार केंद्र, पुणेच्या अध्यक्ष आमदार डॉ. गोऱ्हे यांनी जेष्ठ नागरिकांना दिला. वृद्धाश्रम हे असूच नयेत प्रत्येक मुलांनी व सुनेने आपल्या आई वडिलांचा तसेच सासू सासऱ्यांचा संभाळ करावा. मात्र, बरीच मुले ही नोकरीसाठी देश - परदेशामध्ये जात असल्याने वृद्धाश्रमाची संख्या वाढतेच आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये मातोश्री वृद्धाश्रम उभारणे गरजेचे आहे. असेही डॉ. गोऱ्हे स्पष्ट केले. 
  
पुण्यातील कोंढवा येथे पुण्यधाम आश्रम, जनसेवा फाउंडेशन आणि ज्येष्ठांसाठी कार्यरत विविध संघटना, संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता.१७) ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध व जनजागृती या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. या परिसंवादाचे उदघाटन शिवशाहीर व जेष्ठ साहित्यिक बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते करण्यात आले. जेष्ठांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणाऱ्या शिवसेनेच्या प्रवक्त्या तथा स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रमुख मार्गदर्शन म्हणून परिसंवादामध्ये विचार मांडले.

यावेळी कार्यक्रमास ज्येष्ठ शास्त्रज्ञ विजय भटकर, जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. विनोद शहा, माताजी कृष्णा कश्यप, विश्वस्त मीना शहा, कैलास पटेल, कांचनबेन श्रॉफ, खेमजिभाई गाळा, स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमोल हरपळे, नगरसेविका प्राची आल्हाट, मुकुंद उजमळकर, प्रा. जे. पी. देसाई, अविनाश लकारे, डॉ. आर. टी. वझरकर, काटे सर, रोडे सर, दिलीप पवार आदी उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, जेष्ठांसाठीचे धोरण तयार होऊन त्याच्या अंमलबजावणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल. तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये वृद्धांची आर्थिक फसवणूक मोठया प्रमाणात होत आहे. यासाठी जागृती वाढविण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात. ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांची त्यांच्या नोकराने हत्या केली. या संदर्भात मार्च २०१८ अधिवेशनात जेष्ठ नागरिकांवर वारंवार होणाऱ्या हल्ला यावर आवाज उठविला होता. यावेळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी डॉ. गोऱ्हे यांना आश्वासन दिले होते. या आश्वासनात महाराष्ट्रातील पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक कार्यालयात जेष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार असे सांगितले होते. त्याप्रमाणे हे कक्ष आज जेष्ठांना आधार देण्याचे काम करत आहे. 

या कार्यक्रमाचे आयोजन पुण्यधाम आश्रम, जनसेवा फाउंडेशन, जेष्ठ नागरिक सहाय्यता कक्ष-पुणे विद्यापीठ, समाजसेवा विभाग-भारती विद्यापीठ, आंतरराष्ट्रीय दिर्धायु केंद्र, महाराष्ट्र जेष्ठ नागरिक महासंघ, मध्यवर्ती जेष्ठ नागरिक संघटना, भारतीय हास्ययोग परिवार, पुणे महानगर परिसर जेष्ठ नागरिक महासंघ, एकता योग ट्रस्ट यांनी केले होते.

Web Title: Follow up with the government to set up old age homes in every taluka - Dr. Neelam Gorhe