वाहतूक सुरळीत राखण्यासाठी सज्ज राहा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 ऑक्टोबर 2016

पुणे - दिवाळीच्या सुटीनिमित्त नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेरगावी जात आहेत. या कालावधीत जिल्ह्यातील प्रमुख मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वे; तसेच सातारा रस्त्यावरील वाहतूक सुरळीत राहावी, लोकांना त्रास होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी सज्ज राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केले. या काळात वाहतुकीची कोंडी होणार नाही, यासाठी विशेष काळजी घेतली जाणार आहे.

जिल्हाधिकारी राव यांच्या उपस्थितीत महामार्ग पोलिस, ग्रामीण पोलिस, राष्ट्रीय महामार्ग, रस्ते विकास महामंडळ, महसूल विभागाचे अधिकारी यांची तातडीची बैठक झाली. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे या वेळी उपस्थित होते.
राव म्हणाले, की दिवाळी सुटी कालावधीत बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये, याकडे विशेष लक्ष द्यावे. टोल नाक्‍यावर तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागू नये, लेन कटिंग होऊ नये, मोठी वाहने ओव्हरटेक करू नयेत, वाहनाची गती प्रमाणापेक्षा जास्त राहू नये, याबाबत आवश्‍यक उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत; तसेच हाय वे पोलिसांना या कालावधीत आवश्‍यक उपाययोजना करण्यासाठी वाहने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

पुणे-सातारा रस्त्यालगत अतिक्रमण करून विविध पदार्थांची विक्री केली जाते. यामुळेही अपघात होऊ शकतात. वळण रस्त्यावर निकषाप्रमाणे सूचना फलक असले पाहिजेत. त्याचप्रमाणे निकषाप्रमाणे योग्य ठिकाणी कठडे आहेत की नाही याची खात्री करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. संबंधित विभागाकडून सध्या काय परिस्थिती आहे. वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत आदींबाबत सविस्तर माहिती त्यांनी घेतली. तसेच वाहतुकीसंदर्भात विविध समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या. यानुसार रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग, आयआरबी आदी संबंधित विभागांना आवश्‍यक कार्यवाही करण्याबाबत कळविले जाणार असल्याचे सांगितले. दिवाळीच्या सुटीनंतर कायमस्वरूपी उपाययोजनांची कालबद्ध कार्यवाही करून भविष्यात अपघात टाळण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Follow rules of traffic rules